पंकज राऊत,
बोईसर- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात एम.ए.मध्ये मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान तारापूरच्या स्वप्नील चाफेकर यांनी मिळविला असून सोमवारी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती डॉ. मुकेश अंबानी यांचे हस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख उपस्थित होते. त्यांचे हे दुसरे सुवर्णपदक असून प्राचीन कला केंद्र, चंदिगढ कडून मिळालेल्या ‘संगीत भास्कर’ या एम.ए. समकक्ष पदवीतही त्याला सुवर्णपदक मिळाले होते. त्याने या यशाचे श्रेय आपले गुरू व आईवडीलांना अर्पण केले आहे.झी मराठी सा रे ग म प स्पर्धेतून त्याचे नाव व आवाज महाराष्ट्राला परिचित आहे. शास्त्रीय संगीताचे अध्ययन व प्रसार हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे याच क्षेत्रात संशोधन (पी.एच.डी/डॉक्टरेट) करण्यासाठी त्याला यु.जी.सी. (विद्यापीठ अनुदान आयोग)ची अत्यंत प्रतिष्ठेची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. नेट परीक्षाही त्याने उच्चांकांनी उत्तीर्ण केली आहे. त्याने गायनाचे शिक्षण पं. राम देशपांडे (मुंबई) व पद्मिनी दांडेकर (पालघर) यांचेकडून घेतले आहे.