लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काळबादेवीतील सोने व्यापाऱ्याचे तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे साडेसात किलो सोने लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. या चोरीमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या नोकराचा हात असून समतानगर पोलिसांसह गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला आहे.हैदराबाद येथून तब्बल सव्वादोन कोटी रुपये किमतीची साडेसात किलो सोन्याची बिस्किटे घेऊन काळबादेवी येथील सोने व्यापाऱ्याकडे काम करणारा नोकर दोन दिवसांपूर्वी मुंबईत येत होता. प्रवासादरम्यान कांदिवली परिसरात काही लुटारूंनी आपल्याला बेशुद्ध करून सोने लुटल्याचे त्याने व्यापाऱ्याला कळविले. व्यापाऱ्याने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दे, असे या नोकराला सांगितले. व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून नोकराने पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला उलटसुलट प्रश्न विचारत चौकशी सुरू केली. आपला भांडाफोड होऊन आपण पकडले जाऊ या भीतीने नोकराने तक्रार न देताच, व्यापाऱ्याला घेऊन येतो, असे सांगून पळ काढला. नोकर बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने तो हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक पोलिसांनी बेपत्ता झालेल्या नोकरासह अनोळखी व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गुन्हा समतानगर पोलिसांकडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. ठाण्यातील एका सराफा दुकानाच्या तिजोरीतून एक कोटी दीड लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दुकानातील कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.नौपाड्यातील गोखले रोडवरील राजावत ज्वेलर्सच्या गुप्त तिजोरीमध्ये मालक हितेन जैन यांनी प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची ३५ सोन्याची बिस्किटे २९ मे रोजी ठेवली होती. एक कोटी एक लाख ५० हजार रुपयांची ही बिस्किटे तिजोरीतून चोरी झाल्याचे शनिवारी सायंकाळी उघडकीस आले. सोमवारी हितेन जैन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.दुकानाबाहेरील किंवा आतमधील कुलूप सुस्थितीत असल्याने कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी चोरी केली असावी, अशी शंका आहे. दुकानमालकास सोन्याची चोरी नेमकी कधी झाली, याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी, ही चोरी ३० मे रोजी झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. दुकानातील सीसी कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून हे स्पष्ट होते, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.३० मे रोजी रात्री दुकान बंद करताना सर्व लाइट्स बंद करण्यात आले होते. त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोन्याची बिस्किटे चोरल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या कॅमेऱ्यांचे चित्रीकरण रात्री ११.२० ते पहाटे ४.३० या काळात बंद होते. त्यामुळेच पोलिसांना त्यातून काही मिळाले नाही. नौपाड्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ या प्रकरणाची चौकशी करीत असून त्यांनी व्यवस्थापक आणि रोखपालासह दुकानातील इतर कर्मचाऱ्यांचीही सोमवारी दिवसभर चौकशी केली. सर्वांचे जबाब तपासून आवश्यकतेनुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती संजय धुमाळ यांनी दिली. दरम्यान, दुकानाचे मालक हितेन जैन यांनीदेखील त्यांचे कर्मचारी सुरेंद्रसिंग दातारसिंग शेखावत, सफाई कामगार रोहित पारटे आणि दुकानातील इतर कामगारांवर संशय व्यक्त केला आहे.
सव्वातीन कोटींचे सोने लुटले
By admin | Published: June 06, 2017 5:51 AM