मुंबई : लालबागमधील सुप्रसिद्ध असलेले तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९६७ साली स्थापन झालेले हे मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक जाणिवेतून सांस्कृतिक वारसा जपत आहे. या मंडळाचा बाप्पा दरवर्षी वेगवेगळ्या रूपात विराजमान होतो. १९७२-७३ साली मूर्तिकार विठ्ठल झाड हे या बाप्पाची मूर्ती साकारत होते. त्यानंतर मूर्ती घडविण्याची जबाबदारी गेली अनेक वर्षे त्यांचे पुत्र मूर्तिकार राजन झाड यांनी स्वीकारली आहे. बुद्धीची देवता असलेली नयनरम्य व सुबक मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त दूरवरून येत असतात. ‘संकल्पपूर्ती राजा तेजुकायाचा’असे या मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. यंदा पूजेसाठी लहान मूर्तीची प्रतिष्ठाना करण्यात येणार असून, मूर्तिकार मनोहर बागवे यांनी ती साकारली आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात २८ आॅगस्ट रोजी या बाप्पाचा आगमन सोहळा रंगणार आहे. (प्रतिनिधी)।यंदा बळीराजाच्या संकल्पनेवर आधारित देखावाबळीराजा सततच्या दुष्काळामुळे व भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्रासलेला आहे. शेतीमधील मालाला कमी भाव, कमाल जमीन धारणा कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, सावकाराचे कर्जाचे पाश, शेतीसाठी लागणारे बी-बियाणांचे वाढलेले दर, वेळी-अवेळी पडणाऱ्या पावसामुळे होणारे मालाचे नुकसान, यामुळे त्रस्त होऊन आपला बळीराजा आत्महत्या करतो आहे. अशा वेळी गणपती बाप्पा आपल्या अन्नदात्या बळीराजाच्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी व त्याला सुखी, समाधानी आणि सधन करण्याकरिता भव्य रथामधून भ्रष्टाचाराला पायदळी तुडवत भक्तांच्या दर्शनासाठी येणार आहे.>विशेष सामाजिक उपक्रमसुवर्ण महोत्सवी वर्षात जमा होणाऱ्या निधीतून समाजाचे उत्तरदायित्व म्हणून नियोजित सामाजिक उपक्रम ट्रस्टने हाती घेतलेले आहेत. त्यात दुष्काळग्रस्त गावात नागरिकांना व विद्यार्थ्यांना वस्तंूचे वाटप, अष्टविनायक यात्रा, के.ई.एम. रुग्णालय, टाटा रुग्णालयातील नातेवाइकांना अन्नदान, डायलिसीसच्या रुग्णांना आर्थिक मदत आणि महापालिका रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे.>समाजऋण जपण्यासाठी गेली अनेक वर्षे मंडळाच्या वतीने समाजातील प्रत्येक घटकासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला जातो. उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपात स्पर्धा न करता साधेपणा जपत उत्सव साजरा करण्यावर मंडळाचा अधिक भर असतो.- विजय देशमुख, सल्लागार, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
लालबागमध्ये सामाजिक बांधिलकीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
By admin | Published: August 24, 2016 1:46 AM