- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ दोन श्वान (कुत्री) तैनात आहेत. यातील ‘जेनी’ २०१४ पासून व्याघ्र प्रकल्पात कार्यरत आहे, तर आठ दिवसांपूर्वीच डिसेंबर १८ मध्ये ‘गोल्डी’ व्याघ्र प्रकल्पात रूजू झाली आहे.
डब्ल्यू. डब्ल्यू. एफ. ने ही दोन्ही मादी श्वानांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, ती जर्मन सेफई जातीची आहेत. स्निफर डॉग म्हणून त्यांची ओळख आहे. वाघ आणि वन्यजीवांचे शिकारी, त्यांची कातडी-अवयव यासह वनगुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खास प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
वनरक्षक अमरलाल कासदेकरसह आपले ९ महिन्यांचे प्रशिक्षण बी. एस. एफ. ट्रेनिंग स्कुल ग्वालीअर (टेकामपूर) येथे पूर्ण करून ‘गोल्डी’ विशेष व्याघ्र संरक्षण दलात दाखल झाली आहे. अवघ्या ४० दिवसांची असतानाच ‘गोल्डीने या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळविला होता. तर ‘जेनी’ने वनरक्षक आतिफ हुसेन समवेत भोपाळ येथील सैनिकी ट्रेनिंग स्कूलमध्ये आपले ९ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. जेनी आणि गोल्डी केवळ संबंधित वनरक्षकांचेच, वनपरिक्षेत्र अधिकारी यापैकी कुणाचेही आदेश ऐकत नाही. पण, कर्तव्यावर असताना या वरिष्ठ अधिकाºयांना त्या सॅल्यूट मारून शिस्तीचे पालन करतात.
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ‘ढाकणा’ येथे वनरक्षक आतिफ हुसेनसह ‘जेनी’ व्याघ्र प्रकल्पात २०१४ मध्ये आपल्ळा कर्तव्यावर रूजू झाली. पुढे आतिफ हुसेनसह ‘जेनी’ची बदली आकोट वन्यजीव विभागांतर्गंत आकोट येथे केल्या गेली. ‘जेनी’च्या बदलीमुळे ढाकणा येथील रिक्त जागेवर आता गोल्डी रुजू झाली आहे, गोल्डीचे मुख्यालय ढाकणा असून, अमरलाल कास्देकरसह ती तेथे कार्यरत आहेत. व्याघ्र प्रकल्पात तैनात 'जेनी' आणि 'गोल्डी'ला राहण्यासाठी स्वतंत्र शासकीय निवास आहे. क्षेत्रभेटीवर जाताना त्यांच्यासाठी शासकीय वाहन आहे. पाच दिवसांचा आठवड्यासह किरकोळ आणि वैद्यकीय रजा त्यांना लागू आहे. वर्षातून एकदा २१ दिवसांची खास वैद्यकीय रजा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांच्याकरिता खास शासकीय आहार उपलब्ध असून, दररोज अर्धा किलो मटन, सकाळी व संध्याकाळी दुधासह पूरक आहार दिला जातो.
कर्तव्यावर रुजू झाल्यापासून त्यांचा सेवाकाळ सात वर्षांचा निश्चित झाला आहे. यात तीन वर्षांच्या मुदतवाढीही तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणावरून स्वेच्छा सेवैनिवृत्तीचीही सोय आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनरुपाने अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या आहार-विहारासह संपूर्ण देखभाल व्याघ्र प्रकल्पाला करावयाची आहे. सेवानिवृत्तीनंतर मागणीनुसार दत्तक देण्याचीही तरतूद आहे. त्यांच्या देखभाल नोंदीसह त्यांनी बजावलेल्या कर्तव्याच्या नोंदी असलेल्या मेंटेनन्स रजीस्टरच्या रुपाने त्यांची सेवा पुस्तिका तयार आहे.'जेनी'ने २०१४ पासून अनेक वनगुन्हे शोधून काढले आहेत. नाकाबंदी, वाहन तपासणीत आपला सहभाग दिला आहे. अंबाबरवा आकोट वन्यजी विभागांतर्गत सोनाळा रेंजमधील पळसकुंडी त मृत्यूमुखी पडलेल्या वाघाच्या शावकाचे सर्व अवयव आणि शव अवघ्या सहा तासांत तिने शोधून काढले आहेत. चिखलाम येथील वाघाच्या सापळ्यासह जामली येथील सांबर, अंजनगाव येथील अस्वल, खोंगडा येथील उदमांजरच्या शिकाºयांसह उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग यांच्या शासकीय निवासस्थानातील चंदनवृक्ष चोरी प्रकरणातील आरोपींचा शोधही जेनीने घेतला आहे.
नव्याने रुजू झालेल्या 'गोल्डी'चे सध्या स्वत:त्या फिटनेकडे लक्ष असून, धावणे, चालणे यासह अन्य व्यायाम ती दररोज करीत आहे. सध्या मेळघाटची ओळख करून घेण्याकरिता तिची क्षेत्रभेटी सुरू आहेत. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे विशाल बन्सोड यांचे सहकार्य यात उल्लेखनीय ठरले आहे.