पुणे : सोन्याच्या शर्टामुळे चर्चेत आलेल्या ‘गोल्डन मॅन’ दत्तात्रय फुगे (४७, रा. शीतल बाग, भोसरी) यांचा गुरुवारी मध्यरात्री दिघी येथील भारतमातानगरमध्ये निर्घृण खून झाला. त्यांच्या मुलासमोरच धारदार कोयत्याने वार केल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला. आरोपींपैकी एकाकडे असलेल्या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वाढदिवसाचे खोटे निमंत्रण देऊन फुगेंना बोलावून घेण्यात आल्याचेही समोर आले आहे. दिघी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अमोल उर्फ बल्ली कैलास पठारे (वय २४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, आळंदी रस्ता), शैलेश सूर्यकांत वाळके (वय २६, रा. पवार हॉस्पिटलमागे, यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पाखरे (वय ३२, स. नं. ११२/ब, विश्रांतवाडी), निवृत्ती उर्फ बाळू किसन वाळके (वय ४५, रा. गांधी चौक, विठ्ठल मंदिराजवळ, दिघी), प्रेम उर्फ कक्का उर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया (वय २३, रा. रामनगर, वाल्मीकी मंदिरामागे, बोपखेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार बाबू वाळके आणि मुख्य सूत्रधार अतुल मोहिते याच्यासह सातजण पसार झाले आहेत. विशालवर दंगल, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत, तर शैलेशवर मारहाण आणि गंभीर दुखापतीचे गुन्हा दाखल आहेत. याप्रकरणी शुभम दत्तात्रय फुगे (वय २१, रा. शितलबाग, भोसरी) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगे यांचा वक्रतुंड चिटफंड, शुभम फायनान्स या नावाने कर्ज देण्याचा व्यवसाय आहे. यामधून दिघी, भोसरी आदी भागात फुगे यांची ओळख आणि दहशतही वाढली होती. अटक आरोपी फुगे यांना गुंतवणूकदार शोधून देण्याचे काम करीत होते. यातील विशाल पाखरे याने फुगे यांच्याकडून दिड लाख रुपये घेतलेले होते. या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावलेला होता. तसेच एक महिन्यापूर्वी आरोपींसोबत त्यांची वादावादी झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच खूनाचा कट रचण्यात आला.त्यानुसार, मुख्य आरोपी अतुल मोहिते याने शुभमच्या मोबाईलवर फोन करुन त्याच्या वडिलांना मित्राच्या वाढदिवसासाठी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार शुभमने फुगे यांना फोन केला. परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याने आईला फोन करुन निरोप दिला. त्यांच्याकडून निरोप मिळाल्यावर फुगे यांनी शुभमला फोन करुन बिर्याणी आणि खाद्यपदार्थ घेऊन वाढदिवसाच्या ठिकाणी येण्यास सांगितले. फुगे त्यांच्या मोटारीमधून अतुल मोहितेच्या घराजवळ पोचले. मोहिते व अन्य आरोपींनी त्यांना गप्पा मारत जवळच असलेल्या ट्रॅव्हल बसच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी सुरुवातीला वार करीत फुगे यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये दोन मोठे दगड घालून खून केला. हा प्रकार सुरू असतानाच फुगे यांचा मुलगा शुभम बिर्याणी घेऊन घटनास्थळी पोचला. स्वत:च्या डोळ्यासमोरच वडीलांचा होणारा खून पाहून तो जागीच थबकला. आरडाओरडा करीत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रात्रभर कसून शोधाशोध करुन पाचजणांना अटक केली. पोलिसांनी फुगे यांच्या पुतण्याला संशयावरुन ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे,अशी माहिती परिमंडल चारच्या उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली.