वांजळेंनी आणली गोल्डमॅनची क्रेझगळ्यात गोफ, ब्रेसलेट, अंगठ्या मिळून चार ते पाच किलो सोने पुणे : पांढरा शुभ्र पेहराव, बलदंड शरीरयष्टी आणि गळ्यात तब्बल साडेतीन-चार किलोंचे दागिने घातलेले रमेश वांजळे राजकीय पटलावर अवतरले आणि संपूर्ण राज्यात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांना निमंत्रित केले जाऊ लागले. याच बळावर ते आमदारकीची निवडणूक लढवून विधानसभेतही पोहोचले. येथूनच पुणे आणि परिसरात गोल्डमॅनची क्रेझ सुरू झाली.
पुणे शहर आणि परिसरातील जमिनींचे भाव वाढल्यानंतर, मोठ्या प्रमाणात पैसा आला. गुंठामंत्री नावाचा नवीन वर्ग उदयाला आला. त्याचबरोबर जमिनीचे एजंट म्हणून काम करणारेही तयार झाले. गळ्यात सोन्याचा जाडजूड गोफ, हातात ब्रेसलेट, दोन्ही हाताच्या पाचही बोटात अंगठ्या असे चार ते पाच किलो सोने काही जण अंगावर मिरवू लागले.
एका कार्यक्रमात रमेश वांजळे यांनी सर्व दागिने काढले आणि एकाला म्हणाले घाल. बघू ताकद आहे का? खरोखरच अंगावर एवढे दागिने घालायचे, तर बाऊन्सरचा ताफाही बाळगणे गरजेचे ठरू लागले.
जमिनीच्या एजंटगिरीचे काम करणाऱ्यांसाठी, तर अंगावर सोने घालणे म्हणजे व्यवसायाची गुरुकिल्ली मिळविण्यासारखे झाले. याचे कारण शेतकऱ्यांशी जमिनीचा सौदा करायचा म्हणजे, त्या माणसाची पत महत्त्वाची ठरली. अंगावरच एवढे सोने मिरवितात म्हणजे पत असणारच! असेही ठरू लागले. काही एजंट तर गळ्यातील गोफ काढून देऊ का अॅडव्हान्स असेही म्हणतात. वांजळे यांची क्रेझ पाहून अनेकांना आपणही सोने घालावे, असे वाटू लागले. त्यातून पुण्यामध्ये अनेक नवीन गोल्डमॅन तयार झाले. यामध्ये पुण्यातील संगमवाडी परिसरातील सम्राट मोझे हे नाव विशेष. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे फ्लेक्सवर त्यांच्यासोबत झळकणेही प्रतिष्ठेचे ठरू लागले.पिंपरी-चिंचवड परिसरातील बंटी गुजर आणि सनी वाघचौरे अलीकडच्या काळात ह्यगोल्डमॅनह्ण म्हणून प्रसिद्धीस आले. गुजर यांच्या वडलांचा नेहरूनगर परिसरात भंगारचा व्यवसाय आहे. बंटी गुजर हे हॉटेल व्यावसायिक आहेत. दोघांचाही प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी चांगला संपर्क आहे. कपिल शर्मा शो मध्ये दोघेही झळकले होते. पिंपरीतील सुनील पाथरमलही नव्याने गोल्डमॅन म्हणून उदयास येत आहेत. पुण्यातील शंकर भोरडे हे व्यावसायिकही गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. भोर परिसरातील जमीन खरेदी-विक्री करणारे दिलीप यादवही ग्रामीण भागातील ह्यगोल्डमॅनह्ण म्हणून प्रसिद्ध आहेत. रमेश वांजळे यांचे साडू आणि पुण्यातील नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनीही वांजळे यांच्या राजकीयबरोबरच सोने परिधान करण्याचा वारसा पुढे चालविला आहे. त्यांच्या गळ्यातही दागिने असतात.
दत्तात्रय फुगे यांचा शर्ट बनविणारे तेजपाल रांका म्हणाले, फुगे यांच्याकडून झालेल्या शर्टची मागणी अगदी युनिकहोती. त्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. आमच्याकडे अगदी १०० ते १५० तोळे म्हणजे एक ते दीड किलोच्या सोन्याच्या गोफचीही मागणी असते. अंगठ्याही पाच ते सहा तोळ्याच्या मागितल्या जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून लोकांची मानसिकता बदलली असल्याने फार वजनाचे दागिने मागितले जात नाहीत. अंगावर दागिने तर अनेक जण घालतात, पण भोसरीचे दत्तात्रय फुगे यांनी तर थेट सोन्याचा शर्टच शिवला आणि सगळ्या गोल्डमॅनवर कडी केली. डिसेंबर २०१२ मध्ये फुगे यांनी रांका ज्वेलर्स यांच्याकडू हा सोन्याचा शर्ट शिवून घेतला. सोन्याच्या १४ हजार टिकल्या व १ लाख छोट्या कड्यांच्या (रिंग) साह्याने तो बनविला असल्याने कापडाप्रमाणे घडी करता येत असे. शर्टसाठी ३ हजार २०० ग्रॅम व त्याच्या बेल्टसाठी ३२५ ग्रॅम २२ कॅरेटचे सोने वापरण्यात आले. देशातील हा पहिलाच सोन्याचा शर्ट असल्याचा दावा करीत त्याची गिनीज बुक व लिम्का बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्नही त्या वेळी करण्यात आला होता. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची माझी पध्दत असल्याने मी अंगावर सोने घालतो. त्यासाठी भविष्यात कोणताही खर्च करावा लागत नाही. उलट अधिक किंमत मिळते, असे फुगे म्हणायचे.