पाठ्यपुस्तकाचे रूप पालटले : चित्रांचा भरपूर वापर रूपेश उत्तरवार -यवतमाळ इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात नुकताच बदल करण्यात आला असून नवीन शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. अभ्यासक्रमात प्रथमच गोंडी भाषेचा वापर करण्यात आला असून पुस्तकाचा आकार आणि स्वरूप बदलविण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ डोळ्यासमोर ठेऊन तिसरीच्या अभ्यासक्रमात फेरबदल करण्यात आले आहे. २०१४ पासून इयत्ता तिसरीला नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली असून नव्या स्वरूपातील ही पुस्तके राज्यात वितरित करण्यात आले आहेत.पहिलीचा आणि दुसरीचा अभ्यासक्रम यापूर्वीच बदलला आहे. नवीन बदलाने विद्यार्थी पहिली आणि दुसरीत लिहायला-वाचायला शिकली आहेत. तिसरीमध्ये श्रवण, भाषण, संभाषण , वाचन व लेखण ही कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावी याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पुरक रंजक साहित्याची निवड करण्यात आली आहे. मुलांचे भाव विश्व, अनुभव, परिसरातील घटना, प्रसंग याचा विचार करण्यात आला आहे. विविध भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे म्हणून गोंडी भाषेतील कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.‘मरांगे मरांग उरस्काट’ (झाडे लावूया) ही गोंडी कविता या अभ्यासक्रमात घेण्यात आली आहे. माडीया गोंडी भाषा दिनदर्शिकेतून हे गीत घेण्यात आले आहे. यासाठी गोंडी भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे. ही भाषा सर्वांना समजावी म्हणून त्याचा मराठी अनुवादही देण्यात आला आहे. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या मुलांच्या ज्ञानात भर टाकतात. त्यादृष्टीने वृत्तपत्रांनी मुलांसाठी काही स्वाध्याय सुरू केले आहे. यासोबतच परिसरातल्या घटना वृत्तपत्रात येतात. त्या घटनेची बातमी अभ्यासाला आहे. मुसळधार पावसाने वरोरा जलमय असा मथळा असलेली बातमी अभ्यासक्रमात आहे. चित्र आणि चित्रावरचे अनुवाद पाहून मुलांना काय वाटते असे विचारणारे दृश्य पुस्तकात टाकण्यात आले आहे. यामुळे मुलांच्या बौध्दीक ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. मोठ्या आकाराच्या पुस्तकात आकर्षक रंग आणि चित्रांचा भरपूर वापर करण्यात आला आहे.
गोंडी भाषा तिसरीच्या अभ्यासक्रमात
By admin | Published: June 12, 2014 1:21 AM