गोंदिया : राज्यातील आठ ते दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी (दि.३) काढले. यात गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांचे स्थानातंरण मुंबई मंत्रालयात सचिव बहुजन समाज व इतर मागासवर्गीय विभागात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी मागील वर्षी ९ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे रूजू झाले होते. दहा महिने ते गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती हातळण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याची टीका सुद्धा झाली होती. गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली होती. तर मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी मीना यांच्याबाबत जिल्ह्यात नाराजीचा सूर होता. याच दरम्यान बुधवारी राज्य शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याने राजकीय नेत्यांची नाराजी भोवल्याचे बोलल्या जात आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना आपला पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याकडे सोपवून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेशात म्हटले आहे. गोंदिया जिल्हाधिकारीपदी अद्याप कुणाचीही नियुक्ती झाली नसल्याने नवे जिल्हाधिकारी कोण अशी चर्चा जिल्ह्यावासीयांमध्ये आहे.