राजेश शेगाेकारवृत्त संपादक (नागपूर)
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही... अशा शब्दांत प्रेमाची शपथ घेतली जाते.. ही शपथ शब्दश: जगणारा एक प्राणी पृथ्वीतलावर आहे ताे म्हणजे सारस.. हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यांत जगातील सर्वांत मोठा आहे. शिवाय एका सारसचा मृत्यू झाल्यास दुसरा सारसदेखील मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे या पक्ष्यांची जाेडी प्रेमाचे प्रतीक समजली जाते... या पक्ष्याचा अधिवास सध्या महाराष्ट्रात केवळ विदर्भातील गाेंदिया जिल्ह्यात आहे. गाेंदियाचे हे वनवैभव जतन व्हावे, सारसांचा अधिवास फुलावा असे प्रयत्न सातत्याने केले जातात. खुद्द उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही सरकारला याबाबत अनेकदा धारेवर धरले. त्यामुळे सारस संवर्धनाच्या उपाययाेजना सुरू झाल्या. मात्र, त्याही पुरेशा ठरत नसल्याची बाब २३ जूनच्या सारस पक्ष्यांच्या गणनेत समाेर आली. गाेंदियातील सारस पक्ष्यांची संख्या ६ ने कमी झाल्यामुळे सारस संवर्धन प्रेमाची कहाणी अधुरीच तर राहणार नाही ना?
अधिवास धाेक्यात येण्याची कारणेपाणथळ जागांची कमी हाेणारी संख्या
तलाव, नद्यांचे साैंदर्यीकरण केल्याने विहारावर बंधनेशेतीमध्ये वापरली जाणारी कीटकनाशके, खते उच्चदाब वीजवाहिन्यांचा मुक्त विहाराला अडसर तलावांची जैवविविधता नष्ट, व्यवस्थापनाकडे दुर्लक्षवाळू माफियांनी केलेले तलाव आणि नदीचे उत्खनन
उच्च न्यायालयानेही दिले निर्देश
२०२१ मध्ये ‘लोकमत’च्या बातमीवरून नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेत शासन व राज्याचे वनखाते यांना धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशानुसार संवर्धन कृती आराखड्य़ाची रचनाही झाली. मात्र, उपाययाेजनांची गती संथ आहे. महाराष्ट्र राज्य पाणथळ स्थळे प्राधिकरणने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटसोबत करार केला आहे. त्यानुसार कोणती पावले उचलली, अशी विचारणाही केली आहे.
जिथे प्रणय फुलताे, ताे अधिवासच आला धाेक्यात
गाेंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण ७० वेगवेगळ्या ठिकाणी सारस पक्ष्यांचा अधिवास आढळताे. मुख्यत: पाणथळ जागा, तलाव, नदीकाठांवर सारसांच्या जाेडींचा प्रणय फुलताे.
सारस पक्षी हा अधिवासाबाबत अतिशय संवेदनशील आहे. माणसाएवढा उंच असलेल्या सारस पक्ष्याचे घरटेही तेवढेच माेठे असते. या घरट्यात सारस पक्षी केवळ पावसाळ्यातच अंडी घालताे.
एकावेळी एक किंवा दाेन अंडी असे हे प्रमाण असते. तब्बल २५० ग्रॅम वजनाच्या या अंड्यातून सुमारे २६ ते ३५ दिवसांत पिल्लू बाहेर येते. या पिलाची काळजी सारस पक्ष्यांची जाेडी घेते.
मात्र, आता वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रामधून माळढोक पक्षी पूर्णपणे नामशेष झाले आहेत. कदाचित पुढचा नंबर सारसचा असेल.
सारस संवर्धनासाठी केवळ आराखड्याची घाेषणा झाली, निधीची तरतूद नाही. काही वर्षांत सारस पक्ष्यांबाबत ग्रामस्थ अतिशय सकारात्मक झाले आहेत. जनजागृती प्रभावी झाली, मात्र संवर्धनाबाबच्या उपाययाेजना कागदावरच आहेत -सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक,गोंदिया, अध्यक्ष सेवा संस्था