भाजप-सेनेतील धुसफुसमहाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीमध्ये सन २०१४ पर्यंत शिवसेना हा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत होता; १९९५ च्या निवडणुकीत सेनेला ७३; तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे युतीमध्ये सेनेची दादागिरी चालायची; मात्र गत निवडणुकीत राज्यात भाजपने मुसंडी मारून १२२ जागा जिंकल्या आणि सेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप वावरू लागला अन् सुरुवातीपासूनच भाजप-सेनेमध्ये विविध मुद्यांवर धुसफुस सुरू झाली, ती आजही कायम आहे. बुलेट ट्रेनच्या विषयावरून मंत्रिमंडळ बैठकीतून सेनेच्या मंत्र्यांनी वॉक आऊट केले. दसरा सभेतही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षावर शरसंधानच साधले. वांद्रे येथील पदाधिकारी मेळ्यातही ठाकरेंनी भाजपला दोन हात करण्याचे आव्हान दिले.मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोपराज्यातील भाजप आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरही घोटाळ्याचे आरोप झाले. मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पावरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कथित घोटाळ्याचा आरोप करून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही जमीन अधिसूचित करण्याच्या विषयात आरोप झाले. दोघांनीही राजीनामे दिले; पण ते मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले.यांनी गाजवले वर्ष
- शरद पवार
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांमध्ये आदरस्थानी असलेल्या शरद पवारांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण जाहीर झाल्याबद्दल मराठीजनांनी आनंद व्यक्त केला. पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सवही साजरा केला. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चाचे नेतृत्वही पवारांकडेच होते.
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द देदीप्यमान आहेच; पण त्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाने यंदा काळजी निर्माण केली. निलंगा येथे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; तर अलिबागमध्ये त्यांचा अपघात होता होता सुदैवाने वाचला. अन्य दोन घटनाही अशाच घडल्या.
- नारायण राणे
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे यांनी अखेर स्वाभिमान या राजकीय पक्षाची घोषणा केली. भाजपला त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचे आहे. शिवाय राणेंचीही तशीच इच्छा आहे; पण त्यांच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा अडसर आहे. अर्थात भाजप त्यांना मानाचे मंत्रिपद देतो किंवा नाही. यावरही बरेच अवलंबून आहे.
- रावसाहेब दानवे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या वक्तव्यांमुळे वादग्रस्त ठरले. नोटाबंदीच्या काळात ५००, १००० रुपयांच्या नोटा द्या, बदलून देतो आणि तूर खरेदीच्या मुद्यावर शेतकºयांना ‘साले’ संबोधल्याबद्दल दानवे टीकेचे धनी झाले.मिनी मंत्रालयांची रणधुमाळीग्रामीण आणि शहरी मिनी मंत्रालयांच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. मुंबई, नागपूरसह १० महापालिका आणि पुणे, औरंगाबादसह २५ जिल्हा परिषदांच्या सरत्या वर्षातील सुरुवातीलाच निवडणुका झाल्या. राज्यात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज संस्थांची रणधुमाळी पाहायला मिळाली. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या उत्साहात प्रचारात भाग घेतला अन् आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत प्रचार गाजविला. सर्वच पक्षांमध्ये बंडोबांनी सुरुवातीला त्रस्त केले. नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये बंडखोरांनी राडेबाजी केली. फेब्रुवारी -२०१७ च्या अखेरच्या सप्ताहात निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपने आठ महापालिका जिंकून शहरी भागावरील आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. शिवाय शिवसेनेबरोबर लढून १३ जिल्हा परिषदा काबीज केल्या अन् ग्रामीण महाराष्टÑातील शिरकावही आता व्यापक झाल्याचे दर्शवून दिले. काँग्रेस-राष्टÑवादीने ११ जिल्हा परिषदा जिंकल्या अन् महाराष्टÑात पुन्हा मुसंडी मारण्यात सक्षम असल्याचे संकेत दिले. नंतर झालेल्या नांदेड महापालिकेत मात्र अशोक चव्हाणांनी बाजी मारून काँग्रेसची सत्ता राखली.ठळक नोंदी
- जानेवारी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहारप्रकरणी मोहोळचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी.
- फेब्रुवारी : स्वतंत्र विदर्भासाठी संघर्ष करणारे नेते जांबुवंतराव धोटे (वय ८३) कालवश.
- मार्च : सैनिकांबद्दल अपशब्द; आमदार प्रशांत परिचारकांच्या निलंबनाची मागणी.
- एप्रिल : महापालिका निवडणुकीत लातूर, चंद्रपुरात भाजप; तर परभणीत काँग्रेस विजयी.
- मे : निलंगा येथील हेलिकॉप्टर अपघातात मुख्यमंत्री बचावले.
- जून : शेतक-यांना दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी.
- जुलै : पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे अतुल भोसले यांची निवड
- आॅगस्ट : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ.
- सप्टेंबर: बुलेट ट्रेन प्रकल्पावर शरद पवारांची टीका.
- आॅक्टोबर : ८.५० लाख शेतकरी कर्जमुक्त.
- नोव्हेंबर : राज्यात ऊसदर आंदोलन.
- डिसेंबर : विधानभवनावर विरोधकांचा मोर्चा.