विश्वास खोड - पुणेराज्य शासनाने आय. टी. पार्कमधील माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) व माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा (आय.टी.ई.एस.) क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन (रेडी रेकनर) व्यावसायिक दराऐवजी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या नोंदणी व्यवहारांमध्ये १५ टक्के कमी मुद्रांक शुल्क भरावे लागेल. मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी या माहितीस दुजोरा दिला. ते म्हणाले उद्योगांची वाढ व्हावी आय. टी. व आय.टी.ई.एस. क्षेत्रातील व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क आकारणी वाणिज्य दराने न करता औद्योगिक दराने करावी, अशा सूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार मुंबईसाठी व मुंबई वगळता राज्यातील अन्य भागासाठी वार्षिक मूल्य दर निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे व्यावसायिक ऐवजी औद्योगिक दराने मुद्रांक शुल्क आकारणी केल्यास आय. टी. व आय.टी.ई.एस.या क्षेत्राचे मुद्रांक शुल्क आकारणी दर १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मुंबईसाठी तळमजल्यावरील, वरच्या मजल्यावरील मूल्यांकन कसे करावे याबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मूल्यांकन केले जाईल.उर्वरित महाराष्ट्रात रस्त्याच्या सन्मुख असलेली दुकाने व कार्यालयांना वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दुकाने, कार्यालयाच्या दराने मूल्यांकन केले जाईल. साडेचारशे ते सातशे चौरस मीटरपर्यंत ५ टक्के, ७०० ते ९०० चौरस मीटर आकार असलेल्या मिळकतींना १० टक्के, ९०० ते २३०० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या बांधकामांच्या मूल्यांकन दरात १५ टक्केवजावट करण्यात आली आहे.
आयटी क्षेत्रासाठी आले ‘अच्छे दिन’
By admin | Published: March 05, 2015 10:50 PM