अशोक पाटील-इस्लामपूर -पंधरा वर्षांहून अधिक काळ मंत्रीपद भोगले आहे. मंत्रिपदावर असले की सर्वसामान्य जनता दुरावली जाते. त्यापेक्षा विरोधी बाकावर बसल्यानंतर सर्वसामान्यांच्या भावना कळतात. त्यामुळे संपर्क वाढतो. विरोधात राहिल्यानंतर काही दिवसातच चांगले दिवस येतील. त्यामुळे पर्याय शोधणे हा उपाय नव्हे, असे स्पष्ट मत माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जयंत पाटील यांनी आज मतदारसंघातील विविध विवाह सोहळ्यांना हजेरी लावली. वडगाव येथील एका कार्यक्रमात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आपण कोणत्याही विषयावर मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे मी दुसरा पर्याय शोधत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू असल्याचे वृत्त होते. यामध्ये तथ्य नाही. याउलट गेली १५ वर्षे आपण सत्ता भोगली आहे. सत्तेत राहून प्रामाणिक आणि करेक्ट काम करीत राष्ट्रवादी पक्ष भक्कम केला आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे. राज्यात राष्ट्रवादीचे पानिपत झाले असले तरी, राष्ट्रवादीत राहून यापुढे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहे.भूतकाळातील राजकारणाचा अभ्यास केला असता, विरोधी बाकावर बसून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना चांगले दिवस येतात. त्यामुळेच आपण विरोधी बाकावर बसूनच जनतेची सेवा करणार आहोत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विधानसभेत आवाज उठवू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही गांभीर्याने विचार करण्यास शासनाला भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. पाटील बोलत असताना त्यांच्याभोवती जनमत नसलेल्या कार्यकर्त्यांचा घोळका होता. त्यातील काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करुन, जयंत पाटील यांच्यापुढे मोठेपणा मिरविण्याचा प्रयत्न केला. यावर त्याठिकाणीच उपस्थित असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
विरोधात राहूनही चांगले दिवस येतील
By admin | Published: December 15, 2014 11:00 PM