कोल्हापूर : महाराष्ट्रात युवकांना चांगल्या सुविधा आहेत. कोल्हापूरचे वातावरण चांगले आहे. येथे एका वेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेत आहोत, अशा भावना मणिपूर व चंदीगढ युनिव्हर्सिटीच्या युवक-युवतींनी शनिवारी व्यक्त केल्या. मणिपूर युनिव्हर्सिटीमध्ये बी.एड. करणारा सरबजित याने कोल्हापुरातील वातावरण जरा उष्ण असल्याचे सांगत बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितले की, महाराष्ट्र हे विकसित राज्य असून, येथे युवकांना चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. आमचे राज्य विकासाच्या दिशेने पावले टाकत आहे. महाराष्ट्राप्रमाणे आम्हा युवकांना सुविधा मिळाल्यास निश्चितपणे आमच्याही विकासाची गती वाढेल, असे सांगितले. राज्य साक्षरतेच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या पुढे असणाऱ्या मणिपूरमध्ये सध्या नागालँड जमातींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्त्रियांच्या ३३ टक्के आरक्षणाला विरोध केला आहे. याबाबत मणिपूर युनिव्हर्सिटीतील संगीत विषयाचे शिक्षण घेणाऱ्या धनमंजुरी आणि बी.एड. करणाऱ्या विद्याराणी यांना विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मात्र, कोल्हापूरचे वातावरण चांगले असून, आपल्याला आवडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चंदीगढ युनिव्हर्सिटीच्या संघाचा नाट्यदिग्दर्शक असलेल्या कौशल्य देवगणने वातावरण, जेवण आणि संवाद साधण्याच्या एक वेगळ्या संस्कृतीचा आम्ही अनुभव घेत आहोत. विविधतेमध्ये एकता असल्याचे म्हणायचे आणि कोल्हापुरात येऊन आपल्याच भागातील जेवणाचा आग्रह धरण्यात काही अर्थ आहे का? आम्हाला कोल्हापूरच्या जेवणाबाबत काहीच माहीत नाही. मात्र, एक अनुभव म्हणून त्याचा आनंद लुटत असल्याचे त्याने सांगितले. (प्रतिनिधी)सेल्फीसाठी गर्दीमहोत्सवाच्या निमित्ताने तरुणाईचे एड्सबद्दल प्रबोधन व्हावे यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर रुग्णालय यांच्यातर्फे लोककला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.सकाळपासूनच सरावमहोत्सवासाठी आलेल्या विविध राज्यांतील संघांनी आपल्या नाटक, एकांकिका, नृत्यप्रकारांवर मानव्यशास्त्र विभागाच्या इमारतीच्या बाजूला नव्यानेच तयार करण्यात आलेल्या हिरवळीवर सरावाला सुरुवात केली होती. यावेळी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक थांबून त्यांचा सराव पाहत होते व त्यांचे कौतुक करीत होते.
महाराष्ट्रातील युवकांना चांगल्या सुविधा
By admin | Published: February 12, 2017 12:14 AM