बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, (सोलापूर) : बालरंगभूमी सध्या डबक्यात अडकली आहे़ त्यामुळे बालरंगभूमीची संकल्पना बदलावी़ केवळ कलाकार निर्माण करण्याच्या उद्देशाने बालरंगभूमीकडे पाहू नये, तर मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या उद्देशानेदेखील पाहावे. सध्या थोडी वाईट परिस्थिती असली, तरी बालरंगभूमीला निश्चित चांगले भवितव्य आहे, चित्र आशादायी आहे, असा सूर चर्चासत्रातून निघाला़पहिल्या बालनाट्य संमेलनात रविवारी दुपारच्या सत्रात डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कलाम रंगमंचावर ‘बालरंगभूमी : काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता़ यामध्ये डॉ़ सतीश साळुंखे (बीड), प्रा़ देवदत्त पाठक (पुणे), संजय पेंडसे (नागपूर), संजय डहाळे (मुंबई), अशोक पावसकर, लता नार्वेकर, भाऊसाहेब भोईर आदींचा सहभाग होता़ पूर्वीच्या बालनाट्यातील भव्यता कमी झाली आहे, मात्र बालनाट्य हे टॉनिक आहे़ बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास बालरंगभूमीवर होतो, बालनाट्य चळवळ जोमाने सुरू झाली पाहिजे, असे अशोक पावसकर म्हणाले़ शिक्षण संस्था, कुटुंब संस्था जागृत ठेवल्या, मुलांपर्यंत, शाळेपर्यंत आपण पोहोचले, तर बालरंगभूमीचे चित्र आशादायक आहे, असे देवदत्त पाठक म्हणाले़ बालनाट्यावर प्रेम करा़ करमणूक फक्त पुणे, मुंबईची मक्तेदारी नाही हे दाखवून द्या, असे संजय पेंडसे म्हणाले़ बालनाट्य महोत्सव भरारी घेत आहे़ शहर, नगर, महानगर बालरंगभूमीवर येणारच आहे, मात्र खेडेगावातील विविध समाजातील भावविश्व यामध्ये आले पाहिजे़ संकल्पना बदलली पाहिजे़ समाजाकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी नवनवीन विषयांची मांडणी करून मुलांना डोळसपणा द्या, असे आवाहन डॉ़ सतीश साळुंखे यांनी केले़
बालरंगभूमीला चांगले भवितव्य
By admin | Published: November 30, 2015 3:04 AM