मीरा रोड - यापुढे संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी उपचार केंद्र उभारली जातील. मीरा-भाईंदर महापालिकेने रुग्णालयासाठी जागा द्यावी शासन ते बांधेल. यापुढे आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.
राज्य शासनाने म्हाडाच्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेतील नागरिकांच्या उपचारासाठी महाजन सभागृहात 206 खाटांचे तर ठाकरे सभागृहात 165 खाटांचे दोन कोरोना रुग्णालय उभारून दिली आहेत. या दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड आदी उपस्थित होते. सरनाईक यांनी निधी व रेमिडिसीवीर आदी औषधे देण्याची तर महापौरांनी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. जे जे लागेल ते सरकार तुम्हाला देईल. आज सरकार ठाम उभे आहे म्हणून कोरोनाचा सामना आपण करतोय. पण प्रत्यक्ष लढाई स्थानिक यंत्रणेने करायची असते. अपेक्षा सर्वांच्याच आहेत. पण सरकार निराश करणार नाही. महापालिकेचा मायबाप राज्य सरकार असतो तर राज्य सरकारचा केंद्र सरकार. सुरुवातीच्या काळात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क मिळत नव्हते. पैशांची तर बोंब आहेच. तुम्ही निधीसाठी मला पत्र देता आणि मी केंद्राकडे पत्र देतो. परिस्थिती बिकट आहे पण ती वस्तुस्थिती आहे. रेमिडीसीवरचा पुरवठा सुरळीत असून त्याची किंमत देखील राज्य सरकारने कमी केली आहे. टॉसिझूलीमॅबची किंमत आटोक्यात आणून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु रेमिडिसीवीर, टॉसिझूलीमॅब, फेबिपिरावीर ही औषधे काही उपचार नाही, असे अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर आढळून आले. या औषधांचा अनावश्यक उपयोग जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या औषधांचा अतिरेक होता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविडच्या रुग्णास ऑक्सिजन कमी पडू देता कामा नये. राज्यात चाचणी वाढवली म्हणून रुग्ण संख्या वाढली आहे. म्हणून घाबरू नका. आपल्याला मृत्युदर कमी ठेवायचा आहे व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी ऑक्सिजनची गरज जास्त आहे . या संकटाच्या सुरुवातीला मुकाबला करण्यासाठी कोणीच सज्ज नव्हता. कोरोना वर लस 15 ऑगस्टला येणार असे म्हणतात. लस लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.