मुंबई : काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी गुरुवारी विराजमान झाले. त्यांच्या नियुक्तीची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आणि संपूर्ण सभागृहाने बाके वाजवून वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. विधिमंडळ अधिवेशनाला दोन दिवस उरले असताना शेवटी विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला.
अध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथेनुसार वडेट्टीवार यांना त्यांच्या आसनावर नेऊन विराजमान केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिवेशन कालावधीत विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने होत असलेल्या टीकेला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यानिमित्ताने प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षनेता निवडीस विलंब झाला, याचे खापर माझ्यावर फोडू नका.
विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवारांची निवड करणारे पत्र माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी आले. मला जेव्हा पत्र मिळाले तेव्हा मी निवड केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतापदी निवड करण्यासंदर्भात पत्र दिले होते. ते त्यांनी आता मागे घेतले आहे, त्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावाची मी घोषणा केली, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
सामान्य कार्यकर्ता ते आमदार, मंत्री, विधानसभेचा विरोधी पक्षनेता असा वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. लढाऊ नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.
एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी नाही, तर राज्यातील जनतेचे ऋण फेडण्यासाठी हे सभागृह आहे. दीन-दलित, शोषित, शेतकऱ्यांचा, सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी विरोधी पक्षनेतेपदाचा उपयोग करेन. सत्तापक्ष कितीही बलाढ्य असला तरी मी घाबरणार नाही. जनहितासाठी ठामपणे बोलणारच.- विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते, विधानसभा