ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - दररोराज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वेवर लोकलची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. मध्यतंरी रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवताना मध्य रेल्वेकडे दुर्लक्ष केले होते.
१९ मार्चपासून मध्यरेल्वेच्या प्रवाश्यांना खुशबर मिळणार आहे कारण मध्यरेल्वेने सीएसटी ते अंबरनाथ दरम्यान १३ अतिरिक्त लोकल गाड्या वाढवण्याचे ठरवले आहे. तर ५ लोकल गाड्याचा विस्तार होणार आहे. सध्या ज्या गाड्या ९ बोगीच्या आहेत त्या १२ बोगीच्या होणार आहेत. गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडून होणाऱ्या मृत्यूंची दखल घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असेच म्हणावे लागेल.
ठाणे ते कल्याण या पट्ट्यात गेल्या काही दिवसांत लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांना पत्र देऊन, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याणदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. हार्बर मार्गावरील फेऱ्या वाढवल्याबद्दल मध्य रेल्वेचे अभिनंदन करतानाच, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांवरची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, या मार्गांवर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी ठाण्याच्या पुढे ११ फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. २१ मार्चपूर्वी या फेऱ्या सुरू होणार असून त्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते.