शीतलकुमार कांबळे
सोलापूर : लठ्ठपणा हा आजार फक्त श्रीमंतांना होतो असा समज आता खोटा ठरत आहे. हा आजार भारतात मोठ्या वेगाने पसरत असून गरिबांनादेखील होत आहे. या आजारावरील शस्त्रक्रि या फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात आहे. आता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रियामोफत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा अशाप्रकारची शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.
सोलापूर शहर हे मेडिकल हब असताना येथील खासगी रुग्णालयात देखील लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया होत नाही. शहर व जिल्ह्यातील रुग्ण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांकडे धाव घेत असतात. अशी शस्त्रक्रिया सोलापुरातील खासगी रुग्णालयातही होत नसताना शासकीय रुग्णालयात होणार आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ते आठ लाख रुपये इतका खर्च येतो. या प्रकारची शस्त्रक्रिया करणे ही बहुतांश सोलापूरकरांच्या आवाक्यात नाही. तसेच इतर शहरात जाऊन शस्त्रक्रि या करवून घेणे त्रासदायक ठरते. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने सोलापूरकरांचे चार ते आठ लाख रुपये वाचणार आहेत. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत: करणार आहेत.
‘बेरियाट्रिक’ सर्जरी म्हणजे काय?- लठ्ठपणा कमी करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीने) सर्जरी बेरियाट्रिक सर्जरी करण्यात येते. या शस्त्रक्रियेमध्ये जठराचा आकार कमी करण्यात येतो. यामुळे गरजेपुरते खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. जेवण गरजेपुरते केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तर दुसºया एका शस्त्रक्रियेच्या प्रकारामध्ये पोट तसेच इतर ठिकाणी वाढलेली चरबी कमी करण्यात येते. सोलापुरात एका खासगी रुग्णालयात फार पूर्वी ‘लायपोसक्शन’ ही लठ्ठपणा कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया केली जात होती. सध्या ही शस्त्रक्रिया देखील सोलापुरात होत नाही.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया रुग्णांसाठी मोठी शस्त्रक्रिया करणे अवघड असते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लठ्ठपणाची शस्त्रक्रिया हा त्याचाच एक भाग आहे. सध्या रुग्णालयातील आॅपरेशन थिएटर आणखी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. एका महिन्याच्या आतच लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यास आम्ही सुरुवात करणार आहोत. - डॉ. संजीव ठाकूरअधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय