ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १३ - मुंबईकरांची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणा-या लोकलमधील वाढती गर्दी हा प्रशासनासह चाकरमान्यांसाठीही डोकेदुखीचा विषय ठरला आहे. मात्र आता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी खुशखबर आणली असून गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणा-या 'दिवा' स्टेशनवरही आता फास्ट लोकल थांबणार असल्याने दिव्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून ही अमलबजावणी होणार असून दररोज १० फास्ट लोकल दिवा स्टेशनवर थांबतील.
दिवा स्टेशनवर बांधण्यात येणा-या दोन नवी प्लॅटफॉर्म्सचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर कल्याण ते सीएसटी स्थानकादरम्यान धावणा-या काही फास्ट लोकलना दिवा स्टेशनवरही थांबा देण्यात येणार आहे. रोजच्या ८४ फास्ट लोकल्सपैकी निवडक १० लोकल दिव्यात थांबतील.
दिव्याला थांबणाऱ्या लोकलची संख्या आणि प्रवाशांचं प्रमाण यात तफावत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच दिवा स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून या नव्या निर्णयामुळे स्लो लोकलवरील ताण कमी होईल आणि प्रवासाचा वेळही वाचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.