मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील जनतेला सर्वतोपरी खूश करण्याचे प्रयत्न राज्यातील महायुती सरकारकडून सुरू आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवल्यानंतर आता शेतकऱ्यांना खूश करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे अठराव्या आणि पाचवा हप्त्याचे पैसे ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११.०० वाजता वाशिम येथील समारंभामधून ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या आणि ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १९०० कोटीहून अधिक रक्कम तर राज्याच्या योजनेमधून २ हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
या समारंभामध्ये पीएम किसान योजनेंतर्गत दोन हजार रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दोन हजार रुपये असा एकूण चार हजार रुपयांचा लाभ पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील सुमारे ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल.