औरंगाबाद - जालना लोकसभा मतदार संघात अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या भेटींने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नुकतीच खोतकर यांनी काँग्रेस आमदार सत्तार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी या दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. त्यावर खोतकर यांनी सत्तार आणि आमचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत मैत्रीच्या नात्याने त्यांची भेट घेतल्याचे म्हटले. तसेच आपण केवळ चहा पिण्यासाठी आलो होतो, असंही नमूद केले. तर सत्तार यांनी पुढील दोन दिवसांत खोतकर यांच्यासंदर्भात गुड न्यूज मिळेल असे सांगितले. त्यामुळे खोतकर शिवसेनेला रामराम ठोकणार की, भाजप-शिवसेना युतीचे मराठावाड्याचे समन्वयक म्हणून काम पाहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे खोतकर काय भूमिका घेणार यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चिंता वाढणार आहे. मागील वर्षी खोतकर यांचे चिरंजीव अब्दुल सत्तार यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांत सोबत दिसून आले होते. त्यावेळी देखील खोतकर काँग्रेसमध्ये येणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान काँग्रेसने देखील जालना लोकसभेसाठीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप केली नाही. तर बच्चू कडू देखील दानवे यांच्याविरोधात आक्रमक असून त्यांनी वेळ पडल्यास खोतकर यांना पाठिंबा देऊ असंही म्हटले आहे. तर भाजपकडून जालना लोकसभेत विजयाची हॅटट्रिक करणारे दानवे यांचे तिकीट निश्चित आहे. परंतु खोतकर यांच्या भूमिकेवर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहे.