ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सर्वचजण ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते त्या मान्सूनचे अखेर केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर आगमन झाले आहे. केरळ हे मान्सूनच्या देशातील आगमनाचे प्रवेशव्दार आहे. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेली सर्वसामान्य जनता, बळीराजा सर्वांचेच लक्ष मागच्या काही दिवसांपासून आभाळाकडे लागले होते. मान्सूनच्या आगमनाने त्यांना दिलासा मिळाला आहे.
येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. त्यानुसार मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन झाले आहे. मान्सून अंदमानच्या समुद्रात 14 मे रोजी दाखल झाल्यानंतर 1 जून आधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मान्सून अंदमानच्या समुद्रात 20 मे पर्यंत पोहोचतो पण यंदा काहीदिवस आधी मान्सूनचे आगमन झाले.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात दाखल होतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक वातावरण राहिले तर, 4 ते 5 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. यंदाच्यावर्षी पुरेसा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे बळीराजा, सरकार आणि उद्योगजगताची चिंता कमी झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मान्सूनच्या पावसावर अंवलबून आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, मालदिव, कोमोरिन परिसर, तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम आणि पूर्वमध्य परिसरात प्रवेश केला. मान्सूनची ही वाटचाल पाहता ३० मे रोजी तो केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. केरळबरोबरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, तमिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तरपूर्व भारताच्या काही भागात येत्या २४ तासांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती होती.
मान्सून आला कसे ठरवितात?
मान्सूनने अंदमानच्या समुद्रात प्रवेश केल्यानंतरही भारतीय भूमीपर्यंत येण्यास बराच काळ लागतो़ अंदमानपासून केरळच्या दरम्यान जवळपास १२०० किमीचा समुद्राचा भाग आहे़ त्यामध्ये सॅटेलाईटशिवाय अन्य कोणतेही हवामान केंद्र नाही़ त्यामुळे केरळमध्ये मान्सून कधी येणार, याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते़ केरळमध्ये साधारण १० मेपासून कमीजास्त पाऊस पडण्यास सुरुवात होते.
केरळमधील मिनीकॉय, अमिनी तिरुअनंतपुरम, पुनालुर, कोल्लम, आलापुजा, कोट्टायम, त्रिसूर, कोजीकोड, तलासरी, तन्नूर, कुडुलू, मंगलोर या १४ हवामान केंद्रापैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २़५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे हा पहिला निकष आहे़ वारा पश्चिमेकडून दक्षिणकडे वाहत असला पाहिजे व ते ४ किमी उंचीपर्यंत पोहोचले पाहिजेत़ ५ ते १० रेखांक्ष व ७० ते ७५ रेखांक्ष दरम्यान उर्जा २०० वॅटपेक्षा कमी पाहिजे, हे निकष पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हवामान विभाग केरळमध्ये पाऊस आला, असे घोषित करते.
केरळमधील ६० टक्क्यांपेक्षा अधिक हवामान स्टेशनवर पाऊस झाला असून, सलग दुसऱ्या दिवशीही असाच पाऊस झाल्यानंतर हवामान विभागातर्फे केरळमध्ये मॉन्सून आल्याचे जाहीर केले जाईल़
अरुणाचल प्रदेश परिसरात जोरदार पाऊस
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वाशिम येथे ४३ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.