लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे खोळंबलेल्या मान्सूनने केरळमध्ये आगमन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांची वेस ओलांडत महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांत व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आनंदघन कोसळला आणि मान्सून राज्यात दाखल झाल्याची सुवार्ता सगळीकडे पसरली. दरम्यान, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सूनने संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा, तसेच रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनची प्रगतीची उत्तर सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरिकोटा आणि धुबरी येथून जात आहे. येत्या ४८ तासांत आणखी प्रगती होणार आहे.
समुद्री लाटांनी मुंबईकरांना धडकी!
पावसापूर्वी उसळलेल्या समुद्री तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. मरीन ड्राईव्ह, वरळी, दादर, वांद्रे सी लिंक, जुहू चौपाटी, मार्वे, उत्तन परिसरात चार मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळल्या होत्या. पालिकेचे जीवरक्षक आणि पोलिस दक्षतेसाठी सज्ज होते.
मान्सून अशी मारेल मजल
पुढील ४८ तास मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या ४८ तासात मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
चक्रीवादळ कुठे गेले?
बिपोरजॉय चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी वादळ मुंबईपासून ५८० किमी दूर होते. १५ जूनदरम्यान वादळ मांडवी-कराची ओलांडण्याची शक्यता असून, ताशी १२५ ते १५० किमी वेगाने वारे वाहतील.