सोलापूर : घरपोच गॅस लाईनची सुविधा देण्यासाठी आयएमसी कंपनीकडून शहरात गॅसची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. या कामाच्या खोदाईला परवानगी मिळावी, असा अर्ज कंपनीने महापालिका प्रशासनाकडे केला आहे.
चेन्नई येथील आयएमसी कंपनी शहरात नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार आहे. यामध्ये घरगुती वापरासाठी थेट पाईप लाईनमधून पुरवठा करणे, वाहनांसाठी इंधन म्हणून सीएनजी, औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करणार आहे. हे पर्यावरण पूरक इंधन आहे. गॅस पाईप लाईनच्या कामासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ३६ किलोमीटरची खोदाई करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
या कामाला परवानगी मिळावी, असा अर्ज कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे केला. शहरात स्मार्ट सिटी, अमृत योजनेतून रस्त्याच्या खोदाईची कामे सुरू आहेत. पुन्हा खोदाई केल्यास लोक हैराण होतील. त्यामुळे ३६ किलोमीटर ऐवजी २७ किलोमीटरला परवानगी देण्याचा विचार असल्याचे आयुक्त तावरे यांनी सांगितले. परंतु, ही पाईप लाईन शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यास ३६ किमी मार्गावर परवानगी देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. कंपनीचा अर्ज दाखल करुन घेण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर चर्चा करुन पुढील परवानगी देण्यात येणार आहे.
पंपही सुरू करणार- आयएमसी कंपनीने शहरात थेट पाईप लाईनने गॅस पुरवठा करणार आहे. यासाठी शहरात जवळपास ३०० किमी अंतराची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी एरियातील काम करण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय वाहनांसाठी चार पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. या पंपासाठी जागाही घेण्यात आल्या आहेत. - सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रोजेक्ट