औरंगाबाद : राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याची योजना असून राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य न घेता ही योजना राबविली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ येथे केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल सीबीआयकडे मागितला आहे, परंतु सीबीआयने त्यावर राज्य सरकारला अजूनही उत्तर दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.कोरोना काळात राज्यातील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अतुल्य कामगिरी बजावली. यावर गृह विभागाने ‘अतुल्य हिंमत’ हे कॉफी टेबल बुक काढले आहे. त्याची प्रतही त्यांनी राजेंद्र दर्डा यांना भेट दिली.
जगभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. ५ ट्रिलियन डॉलर एवढा हा व्यवहार आहे. ते रोखण्यासाठी मुंबईत ५ अद्ययावत सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. पोलीस दलात साडेबारा हजार शिपायांची भरती करायची आहे, आणि त्यापैकी ५,३०० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही गृहमंत्री देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी लवकरच ११२ क्रमांकअत्यावश्यक सेवा म्हणून लवकरच ११२ हा क्रमांक कार्यान्वित होईल. हा क्रमांक डायल करताच आणीबाणीच्या वेळी त्वरित पोलीस तेथे पोहोचतील. यासाठी जीपीएस यंत्रणा सज्ज असलेली दोन हजार चारचाकी, तर अडीच हजार दुचाकी वाहने खरेदी केली जातील. यामुळे राज्यभरात ही अत्यावश्यक सेवा मदतीसाठी पोहोचू शकते. यामुळे कायदा-सुरक्षा बळकट होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावात शहीद पोलिसांच्या कुटुंबांना मदतकोरोनाच्या काळात पोलीस दलाने अतिशय महत्त्वपूर्ण काम केले. कायदा व सुव्यवस्थेसोबतच परप्रांतीयांना आपल्या घरी परत पाठविण्यासाठी मदत केली. यात कोरोना प्रादुर्भावात ३३० पोलीस शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ लाख रुपयांची मदत सरकारने केली आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
अर्णब चॅट प्रकरणी केंद्र सरकारने खुलासा करावा बिहारमधील निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्राने अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला; परंतु सात महिने उलटले तरी तपास लागला नाही. उलट टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांकडून तंत्रशुद्ध पद्धतीने चालू आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमधून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अतिसंवेदनशील माहिती उघड झाली असून ती अर्णबपर्यंत कशी पोहोचली, याचा खुलासा केंद्र सरकारने केला पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.