ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 02 - खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात संपूर्ण जून महिना दडी मारलेला मान्सून 1 जुलैपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सक्रीय झाला आहे. गेल्या 24 तासात या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीसाठयात वाढ होण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून शनिवारी देण्यात आली.
दरम्यान, शनिवारी दिवसभर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. तसेच आसपासच्या परिसरातील नाले ओढे. तसेच कोकणातील मोसे खो-यातून मोठया प्रमाणात वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे तळ गाठायला लागलेल्या धरणांमध्ये पुन्हा पाणी वाढण्यास सुरूवात झाल्याने पुणेकरांना अल्पशा प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 313 मिमी पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा 0.27 टीएमसीने वाढला आहे.
खडकवासला धरणसाखळी मधील पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शुक्रवारी सायंकाळी या चारही धरणांमध्ये केवळ 1.46 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. पुणे शहराला दरदिवशी सुमारे 0.03 टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याने हे पाणी शहरास जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढेच होते. त्यातच जूनच्या तीस-या आठवडयात राज्यात विदर्भातून प्रवेश केलेल्या मान्सूनने सर्वदूर हजेरी लावली असली तरी, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळकच पाऊस सुरू होता. मात्र, शुक्रवार (दि.1) पासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. गेल्या 48 तासांपासून हा पावसाचा जोर कायम असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
24 तासात नऊ दिवसांचा पाणीसाठा वाढला
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 0.27 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. शहराला दररोज लागणारे पाणीसाठा पाहता 9 दिवसांचे पाणी या धरणांमध्ये वाढले आहे. दरम्यान, ओढयांमधून तसेच मोसे खो-यातून पानशेत धरणात येणारे पाणी वाढतच असल्याने पुढील काही दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीसाठयात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात. दरम्यान मागील चोवीस तासात खडकवासला धरणात 17 मिमी, पानशेत धरणात 88 मिमी , वरसगाव धरणात 98 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 128 मिमी पावसाची नोंद झाली.