ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - कोकण रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे.
यासाठी 4 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
शिवाय, रोहा-वीर मार्गाचं दुपदरीकरण, नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती तसंच चिपळूण-कराड नवी मार्ग उभाण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितले.
कोकण रेल्वेचा प्रवास सुकर व वेगवान करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून दोन महत्त्वाच्या प्रस्तावांवर काम केले जाणार आहे. यातील संपूर्ण मार्गावरील वाहतुकीची क्षमता दुप्पट वाढावी, म्हणून टप्प्याटप्प्यात दुहेरीकरण जाईल आणि त्यासाठी एक वेगळा प्रस्ताव तयार केला जात आहे. प्रस्तावानुसार, ट्रॅकची व ट्रेनची संख्या वाढवणे, लूप लाइन वाढवण्यावर भर देण्यात येईल. हे काम पूर्ण करतानाच कोकण रेल्वेने विद्युतीकरणावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चार वर्षांत कोकण रेल्वेचे विद्युतीकरण केले जाणार आहे.
विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेला मोठे फायदे होतील. सध्या या रेल्वेचे इंजिन हे डिझेलवर सुरू आहे. त्यामुळे इंजिनातून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आहे. विद्युतीकरण झाल्यास यातून सुटका होईल आणि पर्यावरणपूरक असा कोकण रेल्वेचा प्रवास होऊ शकेल. कोकण रेल्वेची वीजबचतही होण्यास मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.