सोलापूर : ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नोएडा येथे आंतरराष्ट्रीय इलेक्रामा-२०२० या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात देशातील पाच प्रमुख शहरांनी वीज यंत्रणेतील बिघाडावर नियंत्रण करणाºया ‘स्काडा प्रणाली’चे काम व त्याची व्याप्ती याबाबतची माहिती ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय इलेक्रामा-२०२० या प्रदर्शनात देश-विदेशातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांसह ऊर्जा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांसमोर प्रदर्शित करण्यात आली. यात महाराष्ट्रातून गेलेल्या सोलापूरमहावितरणच्या पथकाने देशपातळीवर ‘नंबर वन’चे स्थान मिळविले.
बºयाचदा वीज यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर अनेकदा महत्त्वाची कामे खोळंबतात. विद्युत यंत्रणेतील बिघाड शोधून तो दुरुस्त करेपर्यंत बराच वेळ जातो. या समस्येवरील मार्ग म्हणजे स्काडा. स्काडा म्हणजे सुपरवायझरिंग कंट्रोल अॅण्ड डाटा अॅक्विझिशन. वीज यंत्रणेतील बिघाडावर नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे ‘स्काडा प्रणाली’ महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे़ ज्या शहरांची लोकसंख्या चार लाखांपेक्षा जास्त आणि वार्षिक वीज वापर ३५० दशलक्ष युनिटपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्ये ही प्रणाली राबविण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प सोलापूर, अमरावती, मालेगाव, नवी मुंबई (भांडुप व कल्याण), सांगली, पुणे, नाशिक व कोल्हापूर या आठ शहरांमध्ये राबविण्यात येत आहे.
भविष्यात महावितरणची हीच यशस्वी स्काडा प्रणाली देशभर लागू करण्यात येणार आहे़ याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी देशातील पाच प्रमुख शहरांतील महावितरणच्या ‘स्काडा प्रणाली’च्या पथकांना नोएडा येथे होणाºया आंतरराष्ट्रीय इलेक्रामा-२०२० या प्रदर्शनात आमंत्रित करण्यात आले होते़ या प्रदर्शनात देश-विदेशातील लोकांसमोर सोलापूर, जोधपूर, अमरावती, अजमेर व पाटणा या शहरांच्या पथकांना स्काडा प्रणालीचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
यात सोलापूरच्या पथकाने देश-विदेशातील मान्यवरांची वाहवा मिळवली़ सोलापूरच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता शरावती बाळासाहेब लामकाने यांनी स्काडा प्रणालीचे सादरीकरण केले़ यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री आऱ के़ सिंह, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे कार्यकारी निदेशक पल्का साहनी, ऊर्जा सचिव कुंजीलाल मीणा यांच्यासह देश-विदेशातील ऊर्जा क्षेत्रात काम करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रमुख उपस्थित होते.
काय आहे स्काडा प्रणाली...- ‘स्काडा प्रणाली’ ही एक संगणकीय प्रणाली असून यामुळे प्रत्येक उपकेंद्रातील प्रत्यक्ष माहिती संग्रहित करुन नियंत्रण करणे शक्य होते. विद्युत यंत्रणेतील बिघाडांची माहिती व स्थळ त्वरित कळते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील बिघाड कमी वेळात निदर्शनास आल्यानंतर त्यावर त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते़ त्यानंतर लगेच वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांना दिलासा देऊ शकता येते़ विद्युत यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संकलित होत असल्याने त्या संदर्भात त्वरित निर्णय घेणे शक्य होते. सोलापुरात ही प्रणाली २०१७ पासून सुरू आहे़