मुंबई : गेल्या साडेपाच महिन्यांपासून थांबलेली लालपरीची चाके गतिमान होऊ लागली आहेत. आतापर्यंत ८९ टक्के एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, बुधवारी ४ हजार ८८८ कर्मचारी कामावर परतले. दिवसभरात ७३ हजार ९७० कर्मचाऱ्यांनी गावोगावी सेवा दिली.एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. आता एसटी पुन्हा सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने संपकऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत ७३ हजार ९७० कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, उद्यापर्यंत उर्वरित कर्मचारी हजर होतील, असे सांगण्यात आले.
नुकसानीचा अभ्यास करणार - परबआतापर्यंत एसटीचे किती नुकसान झाले, याचा अभ्यास करून नवीन धोरणे आखली जातील. मनुष्यबळाचे नियोजन आणि गुड्स ट्रान्सपोर्ट, डिझेल पेट्रोलपंप यासंदर्भातील प्रलंबित कामे येत्या काळात पूर्ण केली जातील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एसटी कर्मचारी भावूक आहेत. त्यांना खोटी स्वप्ने दाखवून काही लोकांनी पैसै कमावले, वेगळ्या दिशेला जाण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले, अशी टीकाही त्यांनी केली.
२० एप्रिलचा एसटीचा हजेरीपट विभाग एकूण कर्मचारी हजर परतलेले प्रशासकीय १२००६ ११७९७ २०९ कार्यशाळा १५७९१ १४३३२ १४५९ चालक २९४८५ २६३७३ ३११२ वाहक २४८२६ २१४६८ ३३५८ एकूण ८२१०८ ७३९७० ८१३८