पुणे : संपूर्ण जुलै महिन्यात एकही कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण न झाल्याने देशात काही भागात मॉन्सूनची वृष्टी कमी झाली आहे. मात्र, येत्या ४ व ५ आॅगस्ट दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातील वारे हे अधिक वेगवान होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की,अरबी समुद्रावरुन येणारे वारे हे कमजोर होते. तसेच संपूर्ण जुलै महिन्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. त्यामुळे कोकणात पाऊस झाला असला तरी राज्यातील मोठ्या भुभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या सह्याद्रीच्या पूर्वकडील भागात पाऊस कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये मोठा पाऊस झाला नाही. येत्या ४ व ५ आॅगस्ट रोजी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागाबरोबरच विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील वारे बळकट होऊन पश्चिम भागातील पावसाचा जोर वाढेल. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला. ३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात पाऊसमान कमीदेशाच्या ३६ हवामान विभागापैकी १४ विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. १९ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून ३ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला होता. आता जुलैच्या महिन्याअखेरीस हेच प्रमाण केवळ १२ टक्क्यांवर आले आहे. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्हा ३५ टक्के, नाशिक जिल्हा ३२ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात २०टक्के अधिक पाऊस झाला होता.परंतु, जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने आता २९ जुलै अखेर कोल्हापूर सरासरीच्या तुलनेत -१०, सातारा -२६, नंदुरबार -३३, पुणे २ टक्के अधिक आणि नाशिक येथे सरासरीइतका पाऊस झाला आहे़ त्याचवेळी मराठवाड्यात यंदा अधिक पाऊस झाला आहे.