राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले वर्ष सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक राहिले. विशेषत: आंबेडकरी जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्या या वर्षात मार्गी लागल्या. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न पहिल्या वर्षातच निकाली लागला. शिवाय, पुढील आठवड्यात लंडन येथील बाबासाहेबांच्या घराच्या लोकार्पणाचाही कार्यक्रम ठरला आहे. नव्या सरकारने याबाबत सकारात्मक दृष्टी ठेवत कामकाज चालविले आहे. नवी दिल्ली येथील अलीपूर रोडवरील ज्या बंगल्यात बाबासाहेबांनी आपला अंतिम श्वास घेतला त्या बंगल्याचे स्मारक करण्यासाठी मान्यता मिळाली, निधीही मिळाला. शिवाय जनपथ मार्गावर जवळपास पाच-सहा सरकारी बंगल्यांना एकत्र करत आंतराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारले जाणार आहे. एकूणच सुरुवात चांगली झाली आहे. जनतेला दिलेली सगळीच आश्वासने पहिल्या वर्षात पूर्ण होतील, असे नाही. दलित अत्याचार थांबविण्यासाठी आता प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळायला हवे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक आंतरजातीय विवाह होतील, त्यांना किमान २५ कोटी रुपये प्रोत्साहन निधी म्हणून द्यायला हवेत. जेणेकरून दलित-सवर्ण अंतर पुसण्याच्या दिशेने कार्यक्रम हाती घेतले जातील.
सुरुवात तर चांगली झाली !
By admin | Published: October 30, 2015 1:13 AM