नवी दिल्ली - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्यानंतर आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. सोने गुंतवूणक आणि फिक्स डिपॉझिट करायला सांगून गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक आणि संचालकांनी ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. गुडविन ज्वेलर्सची दुकान बंद असल्याने हजारो लोकांची अवस्था बिकट झाली आहे. गुडविन ज्वेलर्स विरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ज्वेलर्सच्या मालकांची संपत्ती जप्त करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद ठेवली आहेत. हजारो लोकांनी गुडविन ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं पोलिसांनी चौकशीसाठी सुनील आणि सुधीश यांचे डोंबिवलीतले घर गाठले. मात्र त्यांचे घर बंद होते. त्यामुळे ते दोघे फरार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुडविनची शोरुम्स सील केली आहेत. तसेच गुडविनच्या मालकांची मर्सिडीज गाडी आणि त्यांचे दोन फ्लॅटही जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुडविनचा मालक सुनिल कुमार याच्या नावावर ही मर्सिडीज रजिस्टर आहे. एका मोठ्या गुंतवणुकदाराला गॅरेंटी म्हणून ही गाडी देण्यात आली होती. परंतु फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचे दोन फ्लॅटही सील केले आहेत. सलग दहा वर्षे डोंबिवलीमध्ये सराफाचा व्यवसाय करून अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच शेकडो ग्राहकांनी गुडविनकडे सोने आणि रोख स्वरुपात गुंतवणूक केली. आता त्याची सर्व बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. केरळच्या त्रिच्चुर या त्याच्या मूळ जिल्हयातही तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत 261 जणांची नऊ कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुनीलकुमारसह, गुडविन आणि सुधीशकुमार यांच्या नावावर असलेली फेडरल बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि त्रिच्चुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि सर्व व्यवहारांची माहिती बँक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. पलावा गोल्ड सिटीमधील 301 क्रमांकाची सदनिका ही सुनीलकुमारने भाडयाने घेतली होती. तर 201 क्रमांकाची सदनिका ही सुधीशकुमारच्या मालकीची आहे. तिची सुमारे एक ते सव्वा कोटींची किंमत असून आतापर्यंतच्या तपासात हीच मोठी मालमत्ता या पथकाच्या हाती लागली आहे. याव्यतिरिक्त डोंबिवलीतील मानपाडा येथील अंकित सोसायटीमधील दोन दुकानांमध्येही झडतीसत्र राबविले जाणार आहे.