लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंटरनेटचे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या गुगलवरऔरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाल्याचे दिसल्यानंतर सर्व स्तरातून तक्रारींचा पाऊस पडला. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसताच गुगलला उपरती झाली असून औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही शहरांची बदललेली नावे हटविली.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर नामांतराचा पहिला प्रस्ताव रद्द करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा प्रस्ताव मंजूर केला. केंद्राने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसली तरी गुगल सर्च इंजिनसह मॅपवर औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नाव येण्यास सुरूवात झाली.
आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या पत्त्यांवर ‘संभाजीनगर’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून वादाचे वातावरण असताना गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव बदलले.