मुंबई : अॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्रीची पदवी मिळेल.देशात अॅण्ड्रॉइड डेव्हलपर्ससाठी गुगल-युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात स्वप्निलची निवड झाली आहे. याबाबत स्वप्निलने म्हणाला की, शिक्षण सुरू झाले असून सध्या आपण अँग्युलरजेएस अॅप्लिकेशनवर काम करीत आहोत. डेव्हलपर कौशल्य वाढविण्यास, त्यात नैपुण्य मिळवण्यास अभ्यासक्रमामुळे मदत होत असल्याचेही तो म्हणाला.नॅनोडिग्री अभ्यासक्रम विकसित करण्यासह नॅनोडिग्री पूर्ण झाल्यावर पदवीधरांना सर्वोत्तम संभाव्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुगलसह जगातील अन्य आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांशी भागीदारी केल्याचे युडॅसिटीने सांगितले. जगभरातील सर्वोत्तम दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी हा शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केल्याचे संस्थेने स्पष्ट केले....तर कोणीही शिकण्यापासून रोखू शकत नाहीशिष्यवृत्तीमुळे स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार आहे. शिष्यवृत्ती मिळणे हे शिक्षणाच्या पर्यायाने उज्ज्वल भवितव्याच्या उत्तुंग आकाशात उंच भरारी घेण्यासाठी पंख लाभल्यासारखे आहे. ही अनमोल संधी प्राप्त झाल्यामुळे मला एक चांगला लीडर आणि अॅण्ड्रॉइड डेव्हलपर बनण्यास मदत होईल.काहीही शिकण्याची मनापासून इच्छा असेल, तर कोणीही आपल्याला शिकण्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत त्याने शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आशावाद जागवला.
गडचिरोलीतील विद्यार्थ्याला गुगलची शिष्यवृत्ती; अॅण्ड्राईडच्या बेसिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:47 AM