पंढरपूर : भजनाने शुक्रवारी गोपाळपुरातील श्रीकृष्ण मंदिर दुमदुमून गेले. तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई, गजानन महाराज व एकनाथ महाराज या सात मानाच्या पालख्या एकादशीनंतर पुन्हा एकदा काल्याच्या निमित्ताने शुक्रवारी गोपाळपुरातील श्रीकृष्ण मंदिरात एकत्र आल्या आणि वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. गोपाळकाला करून सर्व संतांच्या पालख्या परतीला लागल्या.गोपाळकृष्ण मंदिरामध्ये सर्वात पहिल्यांदा पहाटे ४च्या सुमारास ह.भ.प. चंद्रशेखर अंमळनेरकर महाराज पालखी सोहळा दाखल झाला. त्यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर गोपाळकाल्याला सुरूवात झाली. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास गजानन महाराज, मुक्ताबाई, सोपानकाका, निवृत्तीनाथ महाराज या प्रमुख पालख्या दाखल झाल्या. सकाळी पावणेनऊच्या सुमारास जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी गोपाळपुरात दाखल झाली आणि त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी दाखल झाली. त्यापाठोपाठ अनेक दिंड्या तेथे आल्या.जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळकृष्ण मंदिरामध्ये गोपाळकाल्याचा समारोप झाला. (प्रतिनिधी)गोपाळकाल्याची परंपराकृष्ण अवतारामध्ये गोपाळपूर येथे भगवंत कृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर गुरे राखत. त्याच्या पाऊलखुणा आजही विष्णुपदाजवळ आहेत. सवंगड्यांसह गुरे राखताना दुपारी श्रीकृष्ण सर्वांना एकत्रित करून सहभोजन करीत. एखाद्याच्या घरून शिदोरी आणली नसल्यास तो उपाशी राहू नये यासाठी सर्वांची शिदोरी एकत्र करून सहभोजन होत.जनावरे राखणे ही कृष्णाची क्रीडा समजली जाते. या ठिकाणी कृष्ण त्याच्या सवंगड्यांबरोबर विविध खेळ खेळत असल्याने वारकरीही येथे फुगडी, लंगडी खेळ खेळतात. येथेच विष्णूने कृष्णाचा व विठ्ठलाचा अवतार धारण केल्याची आख्यायिका असल्याने या ठिकाणी आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, असे मानले जाते.
गोपाळकाल्याने आषाढीची सांगता
By admin | Published: August 01, 2015 12:55 AM