- धनाजी कांबळे
मुंबई : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एक झंझावात सुरू केला असताना विविध पक्ष संघटनांतील कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधत असल्याचे चित्र आहे. धनगर आरक्षणावरून सध्या राजकारण तापत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला न्याय मिळत नाही, अशी भावना धनगर समाजाची झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि त्यांना धनगर समाजात असलेल्या पाठिंब्यामुळेच सांगली येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेतून गोपीचंद पडळकर यांना आघाडीत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र गोपीचंद पडळकर हे लोकसभेसाठी नाही, तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तलावाच्या ठिकाणी सत्याग्रही केला. त्या ऐतिहासिक ठिकाणावरून धनगर समाज पुन्हा एकदा सरकार दरबारी धडक मारणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. दरम्यान, राजकीयदृष्ट्या ही एक राजकीय घडामोड असून आगामी निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बंद खोलीत केलेली चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.