Gopichand Padalkar: महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशनंतर आता ही यात्रा कोकणात जाणार आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाचा प्रश्नही आक्रमकपणाने मांडला जात आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. यावेळी धनगरांनी प्रत्येक कार्यक्रमात काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे.
राज्यातील धनगर समाजाला जागरूक करण्यासाठी या धनगर जागर यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमच्या जुन्या नेतेमंडळींनी यासाठी प्रयत्न केला आहे. दोन टप्प्यावर आमची लढाई सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी विचारमंचाच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली आहे. १७० पुरावे देण्यात आले आहेत. राज्य सरकारने तीन प्रतिज्ञापत्र धनगर समाजाच्या बाजूने दिलेली आहेत. डिसेंबर महिन्यात या याचिकेवर निकाल येणार आहे. हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील धनगर समाजाला रस्त्यावरील लढाईला तयार करण्यासाठी जागर यात्रा
न्यायालयाचा निकाल धनगर समाजाच्या बाजूने येईल. मात्र, त्यात काही अडचण आली तर रस्त्यावरील लढाईसाठी धनगर समाजाने तयार राहावे, यासाठी ही जागर यात्रा काढली जात आहे. धनगर समाजाने एसटी आरक्षणासाठी मागणी केलेली नव्हती. तर एसटी अंमलबजावणीची होती. परंतु, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा आमच्या नेत्यांनी पहिल्यांदा धनगर समाजात चळवळ उभी केली आणि जाणीव करून दिली. धनगर समाज आता जागा होऊ लागला आहे, हे शरद पवार यांच्या लक्षात आले. एसटी आरक्षणाची मागणी केली जात आहे. ही मागणी मान्य झाली तर प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल. म्हणूनच संविधानात नसलेले आणि कोणत्याही राज्याने दिले नसलेले एनटीचे आरक्षण नव्याने काढले आणि ते धनगरांना दिले, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
...म्हणून पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे
ओबीसीच्या २७ टक्क्यांमधील ११ टक्के आरक्षण बाजूला केले आणि भटक्या जमातींना दिले. यामध्ये आमचे प्रचंड नुकसान आहे. आमचे मेरिट ओपनच्या मेरिटच्या बरोबर लागते. कधीकधी ते ओपनपेक्षा जास्त लागते. नाहीतर दोन मार्कांनी मागे असते. मग आमचा फायदा काय झाला. आम्हाला त्यातून काय मिळाले. आमच्या लोकसंख्येप्रमाणे काही मिळाले नाही. म्हणूनच पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कुऱ्हाड हे आमचे प्रतिक आहे. आमच्या सगळ्यांच्या हातात कुऱ्हाड असते. कुऱ्हाडीशिवाय आमचे जीवन असू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाजाला आवाहन केले की, पुढच्या काळात धनगरांनी कार्यक्रमात घोंगडे आणि काठी, काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी. हे अन्यायाविरोधातील प्रतिक आहे. अन्यायाविरोधात लढण्याची भूमिका पहिल्यापासून धनगरांची आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.