मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण एकत्र केलं, तर एक वेगळा पक्षच उभा राहील. एवढी मोठी ताकद आणि संख्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे, असे विधान भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे एका कार्यक्रमात केले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. "एके दिवशी गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि भुजबळ साहेब, आपण एक वेगळा पक्ष काढू," असे म्हणाले होते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
हा गौप्यस्फोट करताना भुजबळ म्हणाले, "स्वर्गीय मुंडे साहेबांसंदर्भात बोलायचे झाल्यास, मी एक गोष्ट सांगू इच्छितो. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री होतो. २००२ ची वैगेरे ती गोष्ट असावी, मला नेमके वर्ष आठवत नाही. पण एके दिवशी गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'भुजबळ साहेब, आपण एक वेगळा पक्ष काढूया.' मी म्हणालो कसे काय? ते म्हणाले, तुम्ही, मी, गणपतराव देशमुख आणि रामदास आठवले, आणखीही आपल्यासोबत येतील. असा आपण पक्ष काढू. माला वाटते तो महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पुढे जाईल."
यावर मी (भुजबळ) म्हणालो, "मी उपमुख्यमंत्री आहे. नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. तेव्हा ते दिल्लीत भाजपचे उपनेते होते. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मग आपण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ही सर्व जुळवाजुळव करू शकतो. मला हरकत नाही. मी तर ओबीसींचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलो आहे. मागास अथवा इतर लहान घटकांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही. पण नंतर काय झाले मला काही माहीत नाही. पण त्यांनी तो विषय सोडून दिला. एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो," असे भुजबळ म्हणाले.
पंकजा यांच्या विधानासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, "आजकाल स्वतंत्र पक्ष कुणीही काढू शकतो. पंकजा ताई म्हणतात त्या प्रमाणे तो मोठा पक्षही असू शकेल. पण माझे म्हणणे असे आहे की, एका समाजावर पक्ष काढणे आणि यश मिळवणे हे किती यशदायी आहे, हे मला माहीत नाही. मग तो कोणताही समाज असेल. अनेक समाजांनी वेगवेगळे पक्ष काढले. पण ते कितपत चालले? त्यांना कितपत यश मिळाले? याचा लेखा जोखा त्यांनी बघावा. पण त्यांनी काही तरी अभ्यास केला असेल. पण त्या म्हणाल्या म्हणजे, त्या ताबडतोब पक्ष काढतील, असे वाटत नाही. पण त्यांनी आपले सांगितले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घ्यायला हवा की, स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, असे मला वाटते."
नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा? -पंकजा म्हणाल्या होत्या, "मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण एकत्र केलं, तर एक वेगळा पक्षच उभा राहील. एवढी मोठी ताकद आणि संख्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्यासोबत जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून लोक मला जोडले जाऊ शकले नसते. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात, लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात. म्हणून, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून काम केलेलं आहे आणि तो उभा केला आहे."