- लोकमत न्यूज नेटवर्क
परळी (जि.बीड) : आजचा दिवस हा दु:खाचा असला तरी गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराने आम्हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्याच पार्श्वभूमीवर अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करून आम्ही मुंडे यांना आदरांजली वाहत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.परळी येथील गोपीनाथ गडावर शनिवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात झाला. आजचा हा दिवस राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस असून, यापुढेही सरकार शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या हितासाठी तत्पर राहील. शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतलेल्या निर्णयाबाबत काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. काही लोकांना शेतकऱ्यांचा संप मिटू नये, असे वाटत होते. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. त्यामुळे ते शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या चालीला बळी पडू नका, कारण आम्ही राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित ठेवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.मुंडेंच्या स्वप्नपूर्तीसाठी नवीन गाड्या - सुरेश प्रभू‘आधी केले मग सांगितले’, याप्रमाणे अगोदर आपण मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करणार आहोत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठवाड्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली असून, यापुढेही करण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळीतील रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्र मात केली.