ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १७ : गोरखपूर एक्स्प्रेसने नाशिकहून मुंबईला येणाऱ्या एका युवतीला सासाराम (उत्तर प्रदेश) येथून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने जबरदस्तीने चालत्या गाडीतून ढकलून दिले. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण-ठाकुर्ली दरम्यान घडली. त्या युवतीला डोंबिवलीतील एका कुटुंबाने प्रसंगावधान दाखवत फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. युवतीची आई व अन्य महिला प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. हत्येच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली.
दिनेश यादव असे त्या आरोपीचे, तर रेखा नवले ( २२) असे जखमी युवतीचे नाव आहे. रेखा व तिची आई सरिता या नाशिकला गोरखपूर एक्स्प्रेसमधील महिलांच्या डब्यात चढल्या. त्यात आधीपासूनच यादव याची पत्नी प्रवास करीत होती. तर दिनेश हा जनरल डब्यात होता. परंतु, इगतपुरी स्थानकात तो महिलांच्या डब्यात जाण्यासाठी महिलांशी हुज्जत घालत होता. पण वेळोवेळी महिला प्रवाशांनी त्याला हटकले.
कल्याण स्थानकात मात्र तो प्रतिकार झुगारून महिलांच्या डब्यात शिरला. महिलांनी आरडाओरडाही केला. परंतु, तोपर्यंत गाडी सुरू झाली. महिलांचा रोष बघून तो दरवाजातच स्वच्छतागृहाजवळ थांबला. त्याचवेळी एक ज्येष्ठ महिलेने त्याला हटकले. त्याने तिला धक्काबुक्की केली. त्यामुळे रेखा, सरिता व अन्य महिलांनी त्याला सुनावले. त्याचा राग आल्याने त्याने रेखाला चालत्या गाडीतून खाली ढकलले. जखमी झालेली रेखा कशीबशी रूळाजवळील कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत आली. तेथे तिने मदतीसाठी करत हातवारे केले.
त्याचवेळी कुटुंबासमवेत फिरायला आलेल्या अमित महामुणकर याने तिची विचारपूस केली. गाडीतून पडल्याचे सांगत ती बेशुद्ध पडली. त्यानंतर प्रसंगावधान राखत अमित व त्याच्या पत्नीने रेखाला फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पाबळे यांनी दिली. पोलिसांनी केला अमितचा सत्कार जखमी रेखाला रुग्णालयात दाखल केल्याबद्दल अमित महामुणकर यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पाबळे यांनी पोलीस ठाण्यात सत्कार केला. या घटनेत एकीकडे क्रूरता तर दुसरीकडे माणुसकीचे दर्शन घडल्याचे पाबळे यांनी सांगितले. अमित हा खेळाडू असून, तो डोंबिवलीत वास्तव्याला आहे, असे त्यांनी सांगितले.