ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आग्रही भूमिका घेत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे.
गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जर काही बेकायदेशीर घडताना त्यांनी पाहिलं तर कायदा हातात घेण्यापेक्षा त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी असं ते म्हणाले.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना, ""गोरक्षकांसह कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, काही बेकायदेशीर घडत असेल तर कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांना त्याबाबत कळवावं. स्वतःच्या पोटासाठी मेलेल्या गायींची चामडी काढणा-या लोकांना निर्दयीपणे मारलं जात आहे हे दुर्देवी आहे"" असं आठवले म्हणाले.
यावेळी बोलताना राज्यातील फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही ते म्हणाले. राज्यातील भाजपा सरकार बहुमतापासून 14 ते 15 जागा दूर आहे. जर शिवसेनेने समर्थन काढलं तर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्यावधी निवडणुकांसाठी जाऊ नका असं सांगेल. तसंच समर्थन न काढण्याची शिवसेनेलाही विनंती करेलं. फडणवीस सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास असल्याचं आठवले म्हणाले.