- राहुल वाडेकर/ऑनलाइन लोकमत
विक्रमगड, दि.04 - जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विक्रमगड तालुक्यातील खुडेद - घोडीचा पाडा येथील मंगल कार्यालयाचे काम न करता १० लाखाचे बिल परस्पर काढल्याची तक्रार शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार शरद पाटील यांनी पुराव्यांनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन शरद पाटील यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्याने या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मंगल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीचे बांधकाम शरद पाटील यांच्या पाठपुराव्याने व त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे झाल्याने घोडीचा पाडा ग्रामस्थांनी त्यांचा मंगल कार्यालयाच्या इमारतीसमोर सत्कार केला.
येथील मंगल कार्यालयाची इमारत चोरीला गेल्याचे' सविस्तर वृत्त छापले होते. दि. १४ सप्टेंबर रोजी त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले व रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर दि. १७ सप्टेंबर रोजी तातडीने या मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु झाले व दि. २९ सप्टेंबर रोजी ते पूर्ण झाले. मात्र या इमारतीचे ९ लाख ९९ हजार ५३० रुपयांचे बिल दि. १५ मार्च २०१६ रोजी काढले होते व इमारत पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल सादर केला होता. त्यासंदर्भात आवाज उठवताच तातडीने हालचाली झाल्या व अवघ्या १३ दिवसांमध्ये या इमारतीचे काम पुर्ण झाले.
यावेळी झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील १२ पाडयांतील शेकडो ग्रामस्थ हजर होते. या ग्रामस्थांनी इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला तर गावातील महिलांनी शरद पाटील यांचा यथोचीत सन्मान केला. यावेळी बोलताना ग्रामस्थ रामू भोये यांनी सांगितले की, 'गावामध्ये मंगल कार्यालयाची इमारत होणार आहे. हे आम्हाला माहीतीही नव्हते. मात्र शरद भाऊ गावामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला सावध केले. त्यांनीच आमच्या आदिवासींचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकविला. आता आमच्या गावाचे पैसे खाण्याची कुणी हिंमत करणार नाही'. तर आदिवासी विदयार्थी कृती समितीचे अध्यक्ष लहु नडगे यांनी सांगीतले की, 'आदिवासी बांधवांच्या अनेक योजना भ्रष्टाचाऱ्यांनी हडप केल्या आहेत. आम्ही सगळ्यांकडे तक्रारी करतो, पण कुणीच दखल घेत नाही. शरदभाऊ मात्र आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. त्यांच्यामुळेच गावाला चांगली इमारत मिळाली.'
दरम्यांन या इमारत चोरी प्रकरणी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. माळी यांनी या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात लेखी पत्र विक्रमगड व जव्हार पोलीसांना दिले आहे.