जनजीवन प्रभावित : नागपुरात एकाचा तर अमरावतीत चौघांचा मृत्यू, वाहतूक विस्कळीत, गडचिरोली-नागपूर मार्ग बंदनागपूर : अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे १७ दारे तीन मीटर तर १६ दारे अडीच मीटरने उघडण्यात आली. उपराजधानीतील अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.नागपुरात अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. आशुतोष कुंभारे (१८) रा. सुदामनगरी पांढराबोडी असे मृताचे नाव आहे तर स्वप्नील कुंभारे (१६) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी अचानक सिलिंडर संपल्याने सिलिंडरचा नंबर लावण्यासाठी दोघेही आशुतोष व स्वप्नील आपल्या दुचाकीने जात होते. अचानक झाड कोसळ्याने आशुतोष जागीच मरण पावला. जिल्ह्यातील ४३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३४० घरांचे नुकसान एकट्या काटोल तालुक्यात झाले. खापरखेडा परिसरातील आठ, नांद येथील पाच, कोराडीतील चार, खापा येथील दोन घरांची भिंत पडली. खापा येथे गोठ्याची भिंत पडून बैलाचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील शिंदी बु येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने नुरजा परवीन जमील शाह (३०) ही महिला ठार झाली. तिचा मुलगा खैजाग (८) गंभीर जखमी झाला. चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी येथे घर कोसळल्याने हरिभाऊ शेलोकार (६५), मंदा शेलोकार (६०) हे दाम्पत्य ठार झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव येथे घराची भिंत कोसळून बाळू नारायण रोकडे (५८), यांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. पेढी नदीला पूर आल्यामुळे गावात पाणी शिरले होते. पुसदानजीक पेढी नदीच्या पुरात टाटा सुमो अडकली. या गाडीचा चालकही गाडीतच अडकला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून वाहतूक कोलमडली आहे. विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते. मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दरवाजे तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक वर्धा तालुक्यात २१०़१० मिमी पावसाची नोंद आहे़ बुधवारी पहाटे जिल्ह्याला वादळाचाही जोरदार तडाखा बसला. यामध्ये कारंजा, आर्वी, आष्टी, वर्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं़) येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील झाड कोसळले. दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या. चिस्तुर येथील दोन घरे जमीनदोस्त झाली. वादळामुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांसह कारंजा, आष्टी तालुक्यातील संत्राच्या बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिरपूर (बोके) या गावाला पुराने वेढले तर जळगाव (बेलोरा), नांदपूर या गावात बाकळी नदीचे पाणी शिरले. दोन्ही गावांतील प्रत्येकी ३० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आर्वी-तळेगाव (श्या.) हा मार्ग बंद झाला. नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्र्ग क्र. ६ वरील खडका येथे सुमारे १५ शेतकऱ्यांची शेती पुराच्या प्रवाहाने अक्षरश: खरडून निघाली़ यात पिकांचे मोठे नुकसान झाले. निम्न वर्धा, पोथरा, लाल नाला धरणांतून विसर्ग सुरू असून खैरी धरण ९० टक्के भरले आहे़गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६३० मिमी पाऊस झाला. वडसा-कुरखेडा हा मार्ग गाढवी नदीला पूर आल्याने तर गडचिरोली-आरमोरी मार्ग कठाणी नदीला पूर असल्याने बंद आहे. वैनगंगेला पाणी वाढल्याने कठाणी नदीच्या पुलावरून सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे आज नागपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या खरपुंडीमार्गे आरमोरीकडे रवाना झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गोसेखुर्द आणि निम्न वर्धाची दारे उघडली
By admin | Published: July 24, 2014 12:56 AM