मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार कळविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत आज सायंकाळपर्यंत कळविण्यास सांगितले होते. आज मुंबई ते दिल्लीपर्यंत बैठकांवर बैठका झाल्यानंतर नुकतेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राजभवनाकडे जायला निघाले आहेत. यामुळे काँग्रेसचा पाठिंबा मिळाला का या बाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. दोन्ही काँग्रेसची पत्रे आदित्य ठाकरेंच्या ताब्यात मिळालेली आहेत.
राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे. अशातच आता सत्तेचा निर्णय गेल्या दोन दिवसांपासून कांग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गेला होता. काँग्रेसच्याही बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच शिंदे राजभवनाकडे निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोनिया गांधी यांच्यासोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवर चर्चा केली आहे. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत शिंदेही असणार आहेत. आदित्य ठाकरेही राजभवनाकडे जायला निघाले आहे.
दोन पत्रे तयार... राष्ट्रवादीसोबत काँग्रेसनेही दोन पत्रे तयार ठेवली आहेत. एकामध्ये पाठिंबा देण्याचे आणि दुसरे सत्तेस सहभागी होण्याचे आहे. यापैकी कोणते पत्र शिवसेनेला द्यायचे याचा निर्णय झाला की लगेचच हे पत्र राजभवनावर पोहोचविण्याची सोय केली जाणार आहे. दोन्ही काँग्रेसची पत्रे आदित्य ठाकरेंच्या ताब्यात मिळालेली आहेत. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी एक मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.