मुंबई - शिवसेनेच्या अंतर्गत वादातून शिंदे-ठाकरे असे २ गट निर्माण झाले. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिले आहे तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आयोगाने मशाल चिन्ह दिले असून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नवं चिन्ह मिळताच सगळीकडे जल्लोष साजरा केला आहे.
तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावरून आठवणींना उजाळा दिला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबई दिसत नव्हती. तेव्हा पक्ष वैगेरे काय नव्हतं. १९७८ मध्ये मी शिवसेनेचा गटनेता झालो. आमचा गट छोटा होता. १८ जण महापालिकेत निवडून आलो होतो. आमदार कुणी नव्हतं. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर २ महिन्याने विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत बाळासाहेबांनी बरेच उमेदवार उभे केले होते. आमच्या पक्षाकडे चिन्ह नव्हते. कुणी बॅटबॉल घेतलं होतं तर काहींनी दुसरं चिन्ह घेतले होते. माझं चिन्ह मशाल होतं. शिवसेनेचं चिन्ह वाघ समजायचो तो काढायला कठीण होता. मशाल लगेच भिंतीवर काढता येत होती. प्रचाराला लागलो. तेव्हा शिवसैनिकांनी हातात मशाल घेऊन मते मागत होती. निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिवसेनेतून मी एकटाच निवडून आलो. बाकी सगळ्यांचा पराभव झाला असं त्यांनी सांगितले.
तसेच महापालिकेत गटनेता मी होतो. महापालिकेच्या निवडणुकीत मशाल चिन्ह अनेकांनी घेतले. मला महापालिकेत उभे केले. ७४ नगरसेवक निवडून आले. बाळासाहेबांनी मलाच महापौर केले. मी एकाचवेळी आमदार आणि महापौर असलेला पहिलाच. मी त्यानंतर महापौर परिषदेचा चेअरमनसुद्धा झालो. महापौर झाल्यानंतर दादा कोंडके आणि मी राज्यभर फिरलो. लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचो. तेव्हा आकर्षण खूप वाटायचं. बाळासाहेबांनी मला संधी दिली. आमचे मंतरलेले दिवस होते. पुढे आयुष्यात काय होणार याचा विचार करत नव्हता. आंदोलनात भुजबळ नाही असं झाले नाही असं भुजबळ म्हणाले.
त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अवघड जाणार नाही. ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकेल. परंतु या सगळ्या गोष्टी मनाला त्रास देणाऱ्या आहेत. काय झाले ते आम्ही पाहतोय. ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त सांडले. बलिदान दिले. मोरारजी देसाई यांनी गाडी थांबवली नाही त्यात एका शिवसैनिकाला चिरडले त्यानंतर मुंबई पेटली. ६९ शिवसैनिक दगावले. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो त्यात मी, नारायण राणे, राज ठाकरे असतील परंतु अशारितीने शिवसेनेच्या नावाला आव्हान कुणी दिलं नाही असंही भुजबळ यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"