लोकमत न्यूज नेटवर्क
गहिनीनाथ गड (जि. बीड): नाथ संप्रदायातील गडावर येऊन नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच. पण त्याचबरोबर ‘गोपीनाथांचा’देखील आशीर्वाद मिळाला आहे. गहिनीनाथ गडावरील प्रलंबित आराखडा लवकर मंजूर करून सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७वा पुण्यतिथी सोहळा रविवारी पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. मोनिका राजळे, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आदींची उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, हा ध्वज नव्हे ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. महाराज आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणून काम करेल. नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर आलोय. नाथांचा तर आशीर्वाद मिळालाच; पण राजकारणात ‘गोपीनाथांचा’ आशीर्वाद मला मिळाला. गडाचा मंजूर केलेला आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
पंकजा मुंडेंची दुसऱ्यांदा गैरहजेरी
गहिनीनाथ गडावरील श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची गैरहजेरी होती. गेल्या १५ दिवसांत बीड जिल्ह्यात फडणवीस हे दोन वेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमांत बीडच्या दोन्ही ताईंची गैरहजेरी मात्र राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, गडावरील कार्यक्रमाला मुंडे या आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत, असे समजते.