मुंबई : भाजपाचे आ. अनिल गोटे यांनी केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांकडे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या विरोधात केलेला पत्रव्यवहार विधानसभेत विरोधकांच्या हाती लागल्याने मोपलवार यांना पदावरुन दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली.या घोषणेनंतर उत्साह वाढलेल्या विरोधकांनी लगेच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. तर भाजपाने लातूरमधील मुलींच्या तस्करीत अडकलेली महिला काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती असल्याचा आक्षेप घेत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच अध्यक्षांनी तीन विधेयके मंजूर करुन घेत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.तेलगी प्रकरणात मोपलवार यांचे कसे संबंध आहेत आणि त्यांनी जमा केलेल्या अतिरिक्त संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आ. अनिल गोटे यांनी आयकर विभागाकडे केली होती. तर सतीश सखाराम मांगले यांनी मोपलवार यांनी जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेविषयी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली.मांगले यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमक्या, पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील महागड्या गाड्या ताब्यात घेणे, मांगले यांची तक्रारच दाखल करुन न घेणे आणि या सगळ्या प्रकरणाची क्राईम ब्रँच कडून तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आदेश; अशा अनेक विषयांची कागदपत्रे विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत वाचून दाखवली. त्यामुळे सत्ताधारी बाकावरुन सरकारच्या बाजूने कोणीच बोलायला उभे राहिले नाही.
गोटेंचा पत्रव्यवहार विरोधकांच्या हाती; सभागृहात गदारोळ, कामकाज तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:56 AM