सोलापूर - गणरायाची स्थापना झाल्यानंतर आता सोनपावलांनी माहेरवाशीण गौराईंचे मंगळवारी आगमन होणार आहे. आठ दिवसांपासून श्रीगणेश चतुर्थी व गाैराईंच्या स्वागताची तयारी सुरू होती. मंगळवारी, १० सप्टेंबरला अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
गौराईच्या आगमनानिमित्त खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. दरम्यान, ज्येष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मी-गौरी, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीने नैवेद्य, लाकडी, पितळी सांगाडे त्यांना आकर्षक रंगाच्या साड्या नेसवून साजश्रृंगार केला जातो. प्रथेनुसार गौराईंना घरात आणताना, जिच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. गौरीच्या पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखविण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी, महालक्ष्मी पूजा-आरती करून केलेल्या नैवेद्य दाखविला जातो.
बुधवारी पूजन अन् गुरुवारी विसर्जन... ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबरला बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे, मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबरला गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत विसर्जन करता येईल, असेही पंचांगकर्ते दाते म्हणाले.