कळस : धनगर आरक्षणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. ते बाबीर रुई येथील कार्यक्रमात बोलत होते.राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बाबीर रुई (ता. इंदापूर) येथे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वेळी पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांचा पंढरपूरचा दौरा होता. या वेळी जानकर यांनी श्रीक्षेत्र बाबीर देवस्थानाचे दर्शन घेतले. या वेळी बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अजित पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली.जानकर म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यात ‘घर तेथे रासप’ अभियान राबविण्यात यावे. बूथरचना, कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करावे, पदाधिकऱ्यांनी सर्व जातीधर्मांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे. राज्य पातळीवर पक्षाची ताकत वाढत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पक्ष जोमाने वाढवायचा आहे. असे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग राज्यातील प्रत्येक तालुक्यात आयोजित केले पाहिजेत.’’कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित केल्याबद्दल बापूराव सोलनकर, डॉ. अर्चना पाटील, किरण गोफणे यांचे विषेश कौतुक केले.या वेळी डॉ. अर्चना पाटील यांनी, इंदापूर तालुक्यात पक्ष मजबूत करण्यावर भर देणार असून लवकरच तालुका कार्यकारिणीमध्ये सर्व जातीधर्मांतील युवकांना संधी देण्यात येईल; तसेच महिला आघाडी, युवक आघाडी, ओबीसी मोर्चा या आघाड्यांची बांधणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.या वेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर यांनी लवकरच रासपचा दौंड येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी रासपचे जिल्हाध्यक्ष, हरीश खोमणे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, सतीश शिंगाडे, जोतीराम गावडे हे उपस्थित होते.
धनगर आरक्षणासाठी शासन कटिबद्ध : जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:52 AM