विश्वास पाटील
कोल्हापूर, दि. २४ - कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत पण त्यांची नावे जाहीर करायला राज्य सरकार घाबरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला.
कोल्हापूरमध्ये पानसरे यांच्या स्मारकाचे मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला. यावेळी पानसरे यांच्या कन्या स्मिता व सून मेघा पानसरे या देखील उपस्थित होत्या.
' पानसरे यांचे मारेकरी सापडले असल्याचे मला एसआयटीच्या एका जबाबदार अधिका-यानेच सांगितले आहे. परंतू सरकार त्यांची नावे जाहीर करायला घाबरत आहे. मी यासंबंधी विधीमंडळातही आवाज उठवणार आहे' असे मुश्रीफ म्हणाले.
' मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने हा गौप्यस्फोट केला असल्याने त्यात काहीतरी नक्की तथ्य असू शकते. सरकारनेच यासंबंधी आता स्पष्टता करावी', अशी मागणी भालचंद्र कांगो यांनी केली.
तर ' पानसरे यांचे मारेकरी सापडू नयेत हे सरकारचे षडयंत्रच आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या विधानात नक्की तथ्य असू शकते', असे पानसरे यांच्या कन्या स्मिता यांनी म्हटले.
पानसरे यांच्या हत्येला पाच महिने झाले असून आज मुश्रीफ यांच्या आरोपामुळे आरोपींबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.